कर्जत : पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे काम करताना निष्काळजीपणे केलेल्या ब्लास्टिंगमुळे मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना कर्जत तालुक्यामध्ये घडली आहे. देवका महादू बेडेकर (वय ६५) आणि त्यांचा मुलगा सचिन बेडेकर (वय ४५) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तसंच यावेळी इतर सात जण जखमी झाले आहेत. ब्लास्टिंग करत असताना ठेकेदाराने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना माहिती देणे गरजेचे असते. मात्र अशी कोणतीही पूर्वकल्पना सदर ठिकाणी देण्यात आली नव्हती. त्यामुळेच ही दुर्घटना झाल्याचा आरोप होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत चौक रस्त्यापासून २० मीटर अंतरावर हे ब्लास्टिंग करण्यात आले होते. मात्र ब्लास्टिंग करताना परिसरामधील नागरिकांच्या जीवाचा विचार करण्यात आला नाही. ब्लास्टिंगमुळे दगड उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर पडल्याने दुकानदार देखील गंभीर जखमी झाले आहेत. या ब्लास्टिंगमुळे जीवितहानी झाल्याचं कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं.

वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच अंत; चेहरा ओळखणंही कठीण; कपडे अन् पायाच्या बोटांमुळे ओळख पटली

या दुर्घटनेत आई आणि मुलाला जीव गमवावा लागल्यामुळे आणि सात जण गंभीर जखमी झाल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक बाळा कुंभार तसंच सामाजिक कार्यकर्ते श्याम साळवी यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नागरिकांनी रस्त्यावरून उठण्यास नकार देत हे आंदोलन तसेच सुरू ठेवले होते.

दरम्यान, ब्लास्टिंगच्या कामाविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच हे ब्लास्टिंग बंद करून त्यावर वेगळी उपाययोजना करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाला केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सदर दुर्घटना घडल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे याप्रकरणी आगामी काळात नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here