उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. विद्यार्थिनी तिसऱ्या मजल्यावरून कशी पडली, तिला कोणी धक्का दिला का, या प्रश्नांची उत्तरं अद्याप तरी मिळालेली नाहीत. २२ डिसेंबरला घडलेल्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

रजनी छतावरून खाली कशी कोसळली ते अद्यापही समजू शकलेलं नाही. तिचा मुक्काम असलेल्या घरात वास्तव्यास असलेल्या कोणालाही याची माहिती नाही. ती खोलीत एकटीच राहत होती. छतावर रजनीचा मोबाईल आणि चप्पल सापडली. तिच्या बेडवर नाश्त्याचं ताट होतं. पोलिसांना तिच्या घरात नातेवाईकांचे फोटो सापडले आहेत. ते झालरीसारखे लावण्यात आले होते. रजनीनं स्वत: खाली उडी मारली की कोणी तिला धक्का दिला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. रजनीनं शेवटचा कॉल गुजरातमधील एका तरुणाला केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विद्यार्थिनी एलएलबीचा अभ्यास करत होती. ती सूरतची रहिवासी होती. वरच्या मजल्यावरून पडल्यानं तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त अमरनाथ यादव यांनी सांगितलं. रजनी एकटी राहत होती. आम्ही शाळेतून मुलांना आणायला गेलो होतो. परत आल्यावर आरडाओरडा ऐकू आला. तेव्हा बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा रजनी जमिनीवर पडलेली दिसली. ती कशी पडली याबद्दल काहीच कल्पना नाही, असं शेजारी राहणाऱ्या महिलेनं सांगितलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.