उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये प्रेयसीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. पहिल्या मजल्यावरून पडल्यानंतर तरुण जखमी झाला. घटनेची माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. जखमी तरुणाला तातडीनं अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सक्षमनं शनिवारी सकाळी जन्मदिन साजरा करण्यासाठी प्रेयसीसोबत लखनऊमधील हॉटेलमध्ये मुक्काम केला. दोघे पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक १७ मध्ये थांबले होते. रात्री साडे आठच्या सुमारास सक्षम पहिल्या मजल्यावरून खाली कोसळला. त्याच्या डोक्याला जखम झाली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सक्षमला बाराबिरवातील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तरुणाची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला केजीएमयू ट्रॉमा सेंटरला उपचारांसाठी पाठवलं. मात्र रस्त्यातच त्याला मृत्यूनं गाठलं. पोलिसांनी सक्षमच्या प्रेयसीला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली. सक्षम दारू प्यायला असल्याची माहिती पुढे आली आहे. पण तो खिडकीतून खाली कसा पडला याची माहिती मिळू शकलेली नाही. दोघांमध्ये काही वाद झाला का, असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.