पश्चिम दिल्लीतील सुभाष नगरात असलेल्या एका बहुमजली पार्किंगमधील २० कार एकाचवेळी जळून खाक झाल्या. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून आग नियंत्रणात आणली.

एमसीडीच्या पार्किंगमध्ये आग लागल्याची माहिती पहाटे ४ च्या सुमारास अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास आग नियंत्रणात आली. सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र २० कार जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालं. एक कार पेटवण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडला. यशच्या चुलत बहिणेचे इशानसोबत प्रेमसंबंध होते. मात्र ही बाब यशला आवडत नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. इशानला धडा शिकवण्यासाठी यशनं पार्किंगमध्ये जाऊन त्याच्या कारचा टायर लायटरनं पेटवला. यश तिथून निघून गेल्यानंतर आग वाढली आणि २० कार पेटल्या.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. अर्टिगाचा मालक इशानसोबत यशचा वाद होता. त्याचा बदला घेण्यासाठी यशनं पार्किंगमध्ये उभी असलेली इशानची कार पेटवली, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४३६ आणि ४२७ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. २० पैकी १४ कारच्या नोंदणीसंबंधित माहिती गोळा करण्यात आली आहे. मात्र इतर कार पूर्णपणे जळून खाक झाल्यानं त्यांच्या नोंदणीशी संबंधित माहिती मिळू शकलेली नाही.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.