अमरावती: आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. लेकरू संकटाला सापडल्यावर आई संकटाशी दोन हात करते. मग ते संकट कितीही मोठं का असेना. कारण आईची माया त्या संकटाहून कैकपटीनं मोठी असते. आई स्वत:चा जीव संकटात टाकते. पण आपल्या पिल्लाचा जीव वाचवते. एका आईची अशीच माया अमरावतीकरांनी पाहिली.
छातीशी बिलगून असणाऱ्या छोट्याशा पिल्लाला घेऊन माकडीण विजेच्या तारावर लटकली होती. या तारांवरून सुरक्षित निघण्यासाठी तिला कुठलीही जागा मिळत नव्हती. स्वत:सह पिल्लाला वाचवण्यासाठी बराच वेळ तिचा प्रयत्न सुरू होता. अमरावती शहरातील वडाळी परिसरात हा संपूर्ण थरारक प्रकार घडला. परिसरातील नागरिकांनी सुमारे अर्धा तासापर्यंत हा संपूर्ण थरार अनुभवला. अबब! विहिरीतून पाण्याऐवजी निघाल्या दुचाकी; अख्ख्या बुलढाण्यात ‘बाईकवाल्या विहिरी’ची चर्चा माकडिणीला वाचवण्यासाठी तिच्या सहकारी माकडांनीदेखील बरेच प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. परिसरातील नागरिकांनीही वीज तारेवर बांबू टाकून माकडीणीच्या सुटकेचे प्रयत्न केले. मात्र छातीला बिलगून असणाऱ्या पिल्लामुळे या माकडिणीला तारेवरून इतरत्र कुठेही झेप घेणे शक्य होत नव्हते.
सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर वीज तारेवर लटकतच ही माकडीण कशीबशी एका घराच्या छतापर्यंत पोहोचली. या छतावरदेखील तिच्या मदतीसाठी अनेक माकडं आली होती. आता आपण आपल्या पिलासह सुरक्षित ठिकाणी झेप घेऊ शकतो असा आत्मविश्वास या माकडीणीला वाटताच तिने या घराच्या छतावर झेप घेतली आणि स्वतःसह पिल्लाचा बचाव केला.