करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या चार महिन्यांच्या कालावधीत घरातच थांबावं लागलेल्या प्रवाशांचा अखेर आज, बुधवारी संयम सुटला. अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची सवलत द्यावी असं सांगत आक्रमक झालेल्या शेकडो प्रवाशांनी रेल्वे स्थानकात आंदोलन केलं. त्यानंतर काही आंदोलक थेट रेल्वे रुळांवर उतरले आणि रेलरोको केला. अचानक केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.
आंदोलन करणाऱ्या काही प्रवाशांनी रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केले. होस पाइप आणि सिग्नल गिअर तोडून टाकण्यात आले, असे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. वसई रेल्वे पोलिसांनी भारतीय रेल्वे कायद्यांतर्गत कलम १४७ आणि कलम १७४ अन्वये आंदोलक प्रवाशांवर गुन्हे दाखल केले आहेत. रेल्वे पोलिसांकडून आंदोलनाच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहेत. त्यावरून आंदोलकांनी ओळख पटवली जाणार आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यान, सोशल डिस्टन्सिंग न पाळून लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
नालासोपारा एसटी स्थानकातून कामावर जाणाऱ्यांसाठी रोज १०० ते १५० एसटी बस सोडल्या जातात. आज सकाळी बराचवेळ थांबूनही एसटी स्थानकातून बस सोडण्यात आली नाही. चौकशी केली असता एसटी बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. संयमाचा बांध फुटल्यानं त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केलं. या आंदोलनात एकेक करत शेकडो प्रवासी सहभागी झाले आणि एसटी स्थानकात एकच गोंधळ उडाला. आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्यानंतर या प्रवाशांनी रेल्वे स्थानकाच्या दिशेने कूच केली. रेल्वे स्थानकाबाहेर लावलेले बॅरिकेड्स तोडून ते अचानक रेल्वे स्थानकात घुसले आणि रुळांवर उतरून रेलरोको केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times