भारत-चीनमध्ये सैन्याच्या कोअर कमांडर पातळीवर जवळपास चार बैठक झाल्या आहेत. या बैठकांमधील चर्चेत सीमेवर तणाव कमी करण्यासाठी सैनिकांना मागे हटवण्यावर चीनने सहमती दर्शवली होती. पण नेहमीप्रमाणे दिलेला शब्द पाळताना चीन दिसत नाहीए. या उलट चीनचे सीमेवर कपट कारस्थान सुरूच आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काही आठवड्यांपूर्वी चर्चा केली होती. यानंतर सीमेवरील तणाव काहीसा कमी झाला. आणि काही प्रमाणात चीनने सैनिक मागे घेतले. पण त्यानंतर चीनने सैनिक हटवले नसून ते वाढवले आहेत. यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा वरिष्ठ स्तरावर चर्चेची गरज आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळून चर्चेनंतरही चीनने सैनिक मागे हटवलेले नाहीत. तसंच सैनिक मागे हटवण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाहीए. चीनने सीमेवर ४० हजार सैनिक तैनात केले आहेत. यासह भागांमध्ये रणगाडे, तोफा आणि सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दोन्ही देशात सैन्याच्या कोअर कमांडर स्तरावर गेल्या आठवड्यात चर्चा झाली होती. या चर्चेनंतर सैनिक मागे घेण्याची प्रक्रिया थांबली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. तसंच गलावन खोऱ्यात फिंगर-५ वरून चिनी सैनिक मागे हटण्यास तयार नाहीत. या भागात देखरेखीसाठी छावणी उभारण्यावर चीन अडून बसला आहे, असंही सूत्रांनी सांगितलं. यासोबतच चिनी सैन्याने हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागात छावण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बांधकामही सुरू केले आहे. या दोन भागांमध्ये आता पूर्व लडाखमध्ये आणखी तणावाची स्थिती बनली आहे. हॉट स्प्रिंग आणि गोगरा या भागावर कब्जा करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. पण हा भूभाग आमचा आहे, असा दावा चीनने केला आहे.
भारत-चीनच्या सैन्यात १४-१५ जुलैला कोअर कमांडर स्तरावर चर्चा झाली होती. सीमेवरील सैनिक मागे हटवण्यावर या बैठकीत दोन्ही बाजूंची सहमती झाली होती. त्यानंतर सैनिक हटवण्यात आले आहेत की नाही? याचीही तपासणी पुढच्या काही दिवसांत केली जाईल, यावरही एकमत झालं होतं. पण चिनी सैनिक मागे हटत नसल्याचं समोर आलं आहे.
सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशाचे सैनिक हे आपल्या स्थायी ठिकाणांपर्यंत मागे हटतील, असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत निश्चित झालं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times