वाचा:
रत्नागिरी ते नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर मिरज ते पंढरपूर दरम्यान असलेल्या भोसे गावच्या हद्दीत महामार्गालगत गट नंबर ४३६ मध्ये सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा विशालकाय वटवृक्ष उभा आहे. जवळच यल्लम्मा देवीचे पुरातन मंदिरही आहे. परिसरातील शेकडो पक्ष्यांचे हे हक्काचे नैसर्गिक आश्रयस्थान आहे. अनेक वाटसरू रोज याच्या सावलीत काही काळ विसावा घेऊन मार्गस्थ होतात. मिरजमार्गे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पालख्या याच वटवृक्षाच्या छायेत थांबतात. शेकडो वर्षांपासून हा वटवृक्ष परिसराची वेगळी ओळख बनला आहे. मात्र, महामार्गाच्या चौपदरीकरणात सर्व्हिस रोडमध्ये अडथळा ठरत असल्याने हा तोडण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणने घेतला होता.
वाचा:
भोसे ग्रामपंचायत, यल्लम्मा मंदिर देवस्थान ट्रस्ट, सह्याद्री देवराई निसर्गप्रेमी परिवारासह परिसरातील नागरिकांनी या निर्णयाला विरोध केला होता. ४०० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवून त्याच्या बाजूने महामार्ग तयार करावा, या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. याची दखल घेऊन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना वटवृक्ष वाचवण्याबाबत पत्र पाठवले होते. खासदार संजय पाटील यांनीही वटवृक्षाबद्दल असलेली जनभावना मंत्री गडकरींना कळवली. गडकरींनी तातडीने याची दखल घेऊन वटवृक्षाची पाहणी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना पाठवले. यानुसार प्राधिकरणचे संचालक संजय कदम यांनी बुधवारी परिसरातील नागरिकांसह वटवृक्ष आणि महामार्गाच्या कामाची पाहणी केली. ‘मुख्य महामार्गात वटवृक्षाचा अडथळा नाही. सर्व्हिस रोडमध्ये वटवृक्ष येत असल्याने या जागेत सर्व्हिस रोडचे काम स्थगित करून पर्यायी जागेचा विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. वटवृक्ष वाचवण्याबाबतचा अहवाल लवकरच केंद्रीय परिवहन मंत्र्यांना पाठवला जाईल,’ अशी माहिती संचालक कदम यांनी दिली.
वृक्षप्रेमींनी केले निर्णयाचे स्वागत
वटवृक्ष वाचवण्याच्या निर्णयाचे वृक्षप्रेमींनी स्वागत केले. सह्याद्री देवराई निसर्गप्रेमी परिवार, भोसे ग्रामपंचायत आणि यल्लम्मा मंदिर देवस्थान ट्रस्टनेही वटवृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न केले. संबंधित सरकारी कार्यालये, मंत्री यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यासह सोशल मीडियातही वटवृक्ष वाचवण्याची मोहीम सुरू होती. अखेर या लढाईला यश आल्याने वृक्ष प्रेमींनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times