भाजपचे नेते प्रशांत परमार यांनी ग्वाल्हेर पोलिसांवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी योग्यवेळी कारवाई केली असती तर कदाचित मुलाचा जीव वाचू शकला असता. मात्र पोलिसांनी मंगळवार संध्याकाळपर्यंत प्रकरणाचं गांभीर्य ओळखून कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप परमार यांनी केला.
नेमकं काय घडलं?
ग्वाल्हेरच्या आनंद नगरातील घराचं नगर परिषदेशी संबंधित काम होतं. नगर परिषदेकडून मंजुरी घ्यायची होती. त्यासाठी प्रशांत परमार यांनी नगर परिषदेतील कर्मचारी करण वर्माशी संपर्क साधला. करणचं शिक्षण काही वर्षांपूर्वी परमार यांच्याच महाविद्यालयात झालं होतं. त्यामुळे तो परमार यांच्या परिचयाचा होता.
मंजुरी मिळेल, त्यासाठी ७ लाख ८० हजार रुपये खर्च येईल, असं करणनं परमार यांना सांगितलं. करणनं परमार यांच्याकडून दीड लाख उधार घेतले होते. मंगळवारी करणनं परमार यांच्याशी संपर्क साधला आणि पैसे घेऊन ग्वाल्हेरला येण्यास सांगितलं. यानंतर परमार यांनी मुलगा प्रखरला कार घेऊन पाठवलं. मात्र मंगळवार रात्रीपर्यंत तो माघारी परतला नाही. त्यामुळे परमार यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी याची माहिती ग्वाल्हेर पोलिसांना दिली.
करणनं त्याच्या दोन मित्रांसह प्रखरला कारमधून नेल्याचं परमार यांना समजलं. मागे बसलेल्या दोन तरुणांनी दोरीनं माझ्या मुलाचा गळा आवळला. त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याचा मृतदेह जंगलात नेऊन जाळला, असं परमार म्हणाले. परमार यांनी शंका वर्तवल्यानंतर पोलिसांनी आरोपी करणचा शोध सुरू केला. त्याच्या दोन साथीदारांचा शोधही सुरू झाला. या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी हत्येची कबुली दिली.
दोघांनी दिलेल्या माहितीवरून करारीच्या जंगलातून प्रखरचा अर्धवट जळालेल्या स्थितीतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. यानंतर करणलादेखील अटक झाली. सुरुवातीला त्यानं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर त्यानं गुन्हा कबूल केला. या हत्याकांडामुळे धौलपूर आणि ग्वाल्हेरमध्ये खळबळ उडाली आहे.