Maharashtra Politics | हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. महाविकास आघाडीने नियोजनपूर्वक हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. परंतु, राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे आज सभागृहात काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हायलाइट्स:
- पत्रावर नाना पटोले, आदित्य ठाकरे ते दत्तात्रय भरणेंची सही
- राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार आहे
- या पत्रावर मविआच्या ३९ आमदारांच्या सह्या आहेत
हिवाळी अधिवेशनात गुरुवारी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असल्याने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार सभागृहात होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधिमंडळातील काँग्रेस पक्षाच्या दालनात मविआची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीने विधानसभा सचिवांना तसे पत्रही दिले. या पत्रावर मविआच्या ३९ आमदारांच्या सह्या आहेत. परंतु, इतका मोठा निर्णय होत असताना अजित पवार यांना काहीच कल्पना नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे अविश्वास ठराव मांडण्यासंदर्भातील पत्रावर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांचीही सही आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींपासून अजित पवार अनभिज्ञ कसे काय असू शकतात, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासंदर्भात मविआच्या आमदारांकडून पत्र देण्यात आले तेव्हा मी सभागृहात होतो. मी सकाळी सभागृहात गेलो होतो, तो आत्ता बाहेर आलो. त्यामुळे मला याबाबत कोणतीही कल्पना नाही. मला जे थोडफार कळतं, त्यांच्याविरोधात एक वर्ष अविश्वास ठराव आणता येत नाही. माझी संमती असती तर पत्रावर माझी सही असती. मी यासंदर्भात उद्या माहिती घेऊन तुमच्याशी बोलेने, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती.
राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव का मांडला?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विविध मुद्यांवर सभागृहात ज्यावेळी चर्चा सुरु असते त्यावेळी विरोधकांना बोलू देत नाहीत, असा मविआच्या नेत्यांकडून आरोप करण्यात येत होते. विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये याबाबत नाराजी होती. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांना अध्यक्ष बोलू देत नसल्यानं नाराजी वाढली होती. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी काही सदस्यांनी बोलू देण्याची विनंती केल्यानंतरही अध्यक्षांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळं आमदारांमध्ये नाराजी वाढू लागली होती. राहुल नार्वेकर यांनी सरकारची बाजू घेतली आहे. विरोधकांना आवाज उठवण्याची संधी मिळाली नाही. आम्ही अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.
अविश्वास ठराव मांडण्यासाठी परवानगी मिळणार का?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी मविआच्या नेत्यांनी विधानसभा सचिवांना गुरुवारी पत्र दिले होते. सुनिल केदार, सुनिल प्रभू, सुरेश वरपूडकर आणि अनिल पाटील यांनी हे पत्र विधानसभा सचिवांकडे सोपवले. त्यामुळे आता राजेंद्र भागवत यासंदर्भात काय निर्णय घेणार, ते पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.