गेल्या काही दिवसांत पंतनं दोनदा वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं. त्यासाठी त्याच्या नावानं दोनदा चलान जारी झालं. उत्तर प्रदेशमधील वाहतूक पोलिसांनी पंतच्या नावानं दोन चलान फाडली आहेत. त्यानंतर पंतला नोटिसाही पाठवण्यात आल्या. २२ फेब्रुवारीला रात्री साडे अकरा वाजता पंतच्या मर्सिडीज कारनं (DL 10 CN 1717) वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं. पंतची कार वेगमर्यादेचं उल्लंघन करताना कारवरील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. यानंतर वाहतूक पोलिसांकडून मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत पंतच्या नावानं २ हजारांची नोटीस जारी केली. मात्र त्या नोटिशीला पंतनं आजतागायत उत्तर दिलेलं नाही.
२५ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता पंतच्या याच कारनं नियमांचं उल्लंघन केलं. पंतच्या कारनं पुन्हा एकदा वेगमर्यादेचं उल्लंघन केलं. त्यामुळे कार मालक असलेल्या पंतला २ हजार रुपयांची नोटीस पाठवण्यात आली. पंतनं यानंतरही दंड भरला नाही. त्यामुळे पंतच्या नावानं जारी झालेले दोन्ही चलान अद्याप पेंडिंग आहेत.
दिल्लीहून रुरकीला जात असताना पंतच्या कारला अपघात झाला. त्यावेळी पंतच कार चालवत होता. आज पहाटे ५.३० च्या सुमारास पंतला कार चालवत असताना डुलकी लागली. त्यामुळे त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं. पुढच्या काही मिनिटांत कार दुभाजकाला धडकली. रुडकीजवळ मोहम्मदपूर जाट येथे कारला अपघात झाला. अपघातानंतर पंत विंडशिल्ड फोडून बाहेर आला. त्यावेळी स्थानिकांनी त्याला मदत केली.