पंतच्या कारला अपघात झाल्यानंतर शिखर धवन आणि ऋषभचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ११ सेकंदांचा व्हिडीओ आयपीएल दरम्यानचा आहे. पंत आणि धवन दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतात. व्हायरल व्हिडीओमध्ये दोघे डीसीच्या जर्सीत दिसत आहेत. ‘कोणता सल्ला मला द्यावासा वाटेल?’, अशी विचारणा पंतनं धवनकडे केली. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता धवननं उत्तर दिलं होतं, ‘कार कमी वेगात चालव.’ त्यानंतर दोघेही हसले. ‘ठीक आहे. मी तुमचा सल्ला ऐकला आणि कार कमी वेगात चालवेन, असं त्यावेळी पंत म्हणाला होता.
वेगमर्यादेचं दोनदा उल्लंघन; पोलिसांकडून चलान
गेल्या काही दिवसांत पंतनं दोनदा वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं. त्यासाठी त्याच्या नावानं दोनदा चलान जारी झालं. उत्तर प्रदेशमधील वाहतूक पोलिसांनी पंतच्या नावानं दोन चलान फाडली आहेत. त्यानंतर पंतला नोटिसाही पाठवण्यात आल्या. २२ फेब्रुवारीला रात्री साडे अकरा वाजता पंतच्या मर्सिडीज कारनं (DL 10 CN 1717) वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं. पंतची कार वेगमर्यादेचं उल्लंघन करताना कारवरील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. यानंतर वाहतूक पोलिसांकडून मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत पंतच्या नावानं २ हजारांची नोटीस जारी केली. मात्र त्या नोटिशीला पंतनं आजतागायत उत्तर दिलेलं नाही.
२५ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता पंतच्या याच कारनं नियमांचं उल्लंघन केलं. पंतच्या कारनं पुन्हा एकदा वेगमर्यादेचं उल्लंघन केलं. त्यामुळे कार मालक असलेल्या पंतला २ हजार रुपयांची नोटीस पाठवण्यात आली. पंतनं यानंतरही दंड भरला नाही. त्यामुळे पंतच्या नावानं जारी झालेले दोन्ही चलान अद्याप पेंडिंग आहेत.