काही वेळाने थोडी शुद्ध आल्यावर उमेश रोकडे यांनी घरी फोन लावला आणि घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मयत आणि जखमीला रुग्णालयात दाखल केले. उमेश व प्रियंका यांचा नुकताच विवाह झाला होता. लग्नाला पाच ते सहा महिने झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात नववधूचा मृत्यू झाल्यामुळे पातोंडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आदल्या दिवशीही रोकडे दाम्पत्य नाशिक जाण्यासाठी निघाले होते, मात्र उशीर झाल्याने रेल्वे निघून गेली होती, दुसऱ्या दिवशी पुन्हा रेल्वे स्थानकावर जाताना अपघाताची दुर्देवी घटना घडली.
साखरपूडा झाला…१० जानेवारीला होणार होता विवाह…हळद लागण्यापूर्वी तरुणावर अपघाताच्या रुपाने काळाची झडप
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ तिरपोळे रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून अपघात झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. यात ट्रॅक्टरखाली चिरडून मोहन भाईदास सोनवणे याचा मृत्यू झाला. मोहन भाईदास सोनवणे हा मेहुणबारे गावाजवळ तिरपोळे रस्त्यावरुन ट्रॅक्टरवर बसून जात असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने मोहनचा जागीचा मृत्यू झाला. मोहनचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. १० जानेवारीला त्याचा विवाह होणार होता, त्यामुळे त्याच्या घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती. मात्र त्यापूर्वीच अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला वैद्यकीय आधिकारी यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील हे करत आहेत.