सन २०२३ मध्ये १८ जुलै ते १६ ॲागस्ट २०२३ अधिक श्रावण महिना येणार आहे. त्यामुळे नागपंचमी पासून सर्व सण साधारण १९ दिवस उशीरा येणार आहेत. विवाहोच्छुकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जुलै, ॲागस्ट, सप्टेंबर, ॲाक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यात विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सन २०२३ मध्ये श्रीगणेश चतुर्थी मंगळवार १९ सप्टेंबरला आली असल्याने यावर्षी गणेश चतुर्थीला ‘ अंगारक योग ‘ आलेला आहे. या नूतन वर्षी मंगळवार १० जानेवारी रोजी एकच ‘अंगारकी संकष्ट चतुर्थी’ आहे. सोने खरेदी करणारांसाठी सन २०२३ या नूतन वर्षामध्ये एकूण चार गुरुपुष्य योग आले आहेत. ३० मार्च, २७ एप्रिल, २५ मे आणि २८ डिसेंबर रोजी गुरुपुष्प योग असणार आहेत.
येणाऱ्या नववर्षात ब्ल्यू मून, सुपरमून, २ सूर्यग्रह, २ चंद्रग्रहण पाहण्याचा योग
सन २०२३ मध्ये २ सूर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार असली तरी २० एप्रिल आणि १४ ॲाक्टोबरची दोन्ही सूर्यग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. मात्र ५ मे चे छायाकल्प चंद्रग्रहण आणि २८ ॲाक्टोबरचे खंडग्रास चंद्रग्रहण ही दोन्ही चंद्रग्रहणे भारतातून दिसणार आहेत. एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रहास ‘ब्ल्यू मून’ म्हणतात. सन २०२३ मध्ये १ ॲागस्ट आणि ३१ ॲागस्ट रोजी पौर्णिमा आल्याने ३१ ॲागस्ट रोजी ‘ब्ल्यू मून’ योग आला आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला असेल तर ‘सुपरमून’ योग असतो. त्या दिवशी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. सन २०२३ मध्ये १ ॲागस्ट आणि ३१ ॲागस्ट असे दोन ‘सुपरमून योग’ येणार आहेत.
सन २०२३ मध्ये तिथीप्रमाणे शुक्रवार २ जून रोजी आणि तारखे प्रमाणे मंगळवार ६ जून रोजी शिवराज शक ३५० सुरू होणार आहे. सन २०२३ मध्ये रविवार १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन एकाच दिवशी येणार आहे. बलिप्रतिपदा मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी आणि भाऊबीज बुधवार १५ नोव्हेंबर रोजी आहे.