नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कराड शहरवासीयांना करोनापासून चार हात लांब ठेवण्यासाठी करोना योध्याच्या भूमिकेत अविरत कार्यरत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांना घशात दुखत असून तापही येत होता.त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. तसेच त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना बुधवारी घेऊन तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. प्रयोगशाळेने सायंकाळी दिलेला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृष्णा रुग्णालयातील करोना वॉर्डमध्ये त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, नगराध्यक्षा शिंदे यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच त्याचे कार्यालय सील करण्यात आले आहे. तसेच त्यांचा रोज संपर्कात येणाऱ्या अधिकारी , कर्मचारी आणि नगरसेवकांना क्वारंटाइन करावे लागणार आहे. यासाठी याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.
नगराध्यक्षा शिंदे या शुक्रवारीपर्यंत पालिकेत येत होत्या शनिवारपासून त्या कार्यालयात येण्याचे बंद झाल्याने त्यांनी आजारी असल्याचा निरोप त्यांनी दिला होता. त्या घरी उपचार घेत होत्या. बुधवारी सायंकाळी त्यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालिका प्रशासनात घबराट पसरली आहे. त्यांचा रोज संपर्कात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांना क्वारंटाइन करावे लागणार असल्याने यासाठी शिंदे कोरोना बाधित कश्या झाल्या. त्याची माहिती घेत आहोत. ट्रॅव्हल हिस्ट्री काढण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर अधिक स्पष्टता होईल. त्यांच्या सहवासातील लोकांना क्वारंटाइन करावे लागणार आहे. त्यांच्या घरी, कार्यालयातील त्यांच्या नेहमीच्या सहवासातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली आहे.
गेल्या सुमारे साडे तीन महिन्यापासुन त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेत अविरत कार्यरत होत्या. त्यामुळे दगदग व धावपळ झाल्याने ताप आला असावा म्हणून त्यांनी घरीच उपचार सुरू केले होते. मात्र त्यांनी त्यांची करोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे.
माझी प्रकृती स्थिर असून मी लवकरच ठीक होऊन पुन्हा तुमच्या सेवेस हजर असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहीन. अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकून शिंदे यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच कराडकर जनतेनेप्रथम स्वतःची काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे लवकरच बरी होऊन पुन्हा आपल्या सेवेत येईल आपण स्वतःची काळजी घेउन इतरांचीही काळजी घ्यावी. गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. कुटुंबाची काळजी घ्यावी असे भावनिक आवाहनही नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी केले आहे. मात्र नगराध्यक्ष शिंदे यांना करोनाची लागण झाली असल्याचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. याबाबत शहरवासीयांच्यातून त्यांच्या प्रकृतीला लवकरच आराम मिळो व त्या पूर्ण बऱ्या होऊन शहरात कार्यरत होवोत, यासाठी येथे नागरिक प्रार्थना करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times