पंढरपूर: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो भाविक विठुरायाला साकडे घालण्यासाठी पंढरपुरात (Pandharpur) दाखल झालेले असताना आता आमच्याही व्यथा एक म्हणत कोलहापौराच्या तरुणांनी शेतकऱ्याच्या पोरांना बायको मिळू दे असे अनोखे साकडे देवाला घातले. एका बाजूला मुली नोकरदार मुलांच्या मागे लग्नासाठी धावत असताना जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी मुलांची लग्नांत अनेक विघ्ने समोर येत असल्याचे चित्र आहे. टीव्हीवर या ज्वलंत विषयावर शेतकरीच नवरा हवा सारख्या मालिका सुरु होऊन देखील शेतकरी तरुणांची लग्ने होत नाहीत. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आलेल्या शेतकरी तरुणांनी आता थेट विठुरायाला साकडे घालून आता आमच्याकडेही पाहा आणि मुलींना शेतकरी पोरांसोबत लग्न करायची सुबुद्धी दे असे साकडे घातले आहे. वावर आहे तर पॉवर आहे म्हणणाऱ्या या शेतकरी तरुणांना लग्नाला मुली मिळत नसल्याने आता थेट विठुरायाला यात थोडे लक्ष घालायची विनवणी या तरुणांनी केली आहे .
दोन वर्षे कोविड संकटानंतरचे हे सरते वर्ष निर्बंधमुक्त गेले असताना पुन्हा एकदा जगावर कोविडचे संकट घोंघावू लागल्याने विठुराया आता पुन्हा कोविड नको असे साकडे घालत आगामी वर्ष आरोग्यदायी जावे असे साकडे आता भाविक देवाला घालताना दिसत आहेत. वर्षाअखेर पार्ट्यामध्ये घालवण्यापेक्षा विठुरायाच्या दर्शनाने आपले जीवन समृद्ध करण्याचा संदेश नागपूर येथून आलेली प्रज्ञा जाधव देत आहे. तर इतर भाविकांना आता पुन्हा कोविड आणि लॉकडाऊन नको अशी विनंती देवाला करायची आहे. अनेक भाविकांना नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दारात करायची असल्याने पंढरपूरला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने देशभरातील पर्यटक आणि भाविकांनी गर्दी केल्याने सध्या पंढरपूर ओव्हरपॅक झाले आहेत. मंदिर परिसरात भल्या पहाटेपासून लांबच लांब रांगा लागल्याने भाविक तासतास रांगेत उभारून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेत आहेत . सध्या देवाच्या दर्शनाची रांग थेट चंद्रभागा घाटावरील सारडा भवनपर्यंत पोहचली असून भाविकांच्या दर्शनासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे .
पंढरपूरमध्ये हजारो भाविक दाखल
सरत्या वर्षाला विठुरायाच्या दर्शनाने निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं पर्यटक आणि भाविक पंढरपूरमध्ये (Pandharpur) दाखल झाले आहेत. यासाठी मंदिर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मंदिरे रात्रभर उघडी ठेवली जाणार असली तरी विठ्ठल मंदिर मात्र नेहमीच्या वेळेत बंद होणार आहे. आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिराला रात्री फुलांची आकर्षक आरास केली जाणार आहे. गेली दोन वर्षे कोरोना संकटात गेल्यानंतर सरते वर्ष निर्बंधमुक्त आणि चांगले गेल्यानं येणारं नवीन वर्ष संकटमुक्त जावं हीच भावना घेऊन देशभरातील पर्यटक आणि भाविक विठ्ठल चरणी आले आहेत.