फुलेवाडीतील चौथ्या बस स्टॉपजवळ राहणाऱ्या अनुराधा पोतदार सूर्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्सनिस्ट म्हणून नोकरी करत होत्या. शनिवारी सकाळी त्या दुचाकीवरून पतीसोबत हॉस्पिटलकडे निघाल्या. दरम्यान, जेसीबीच्या बकेटचा धक्का दुचाकीला लागला. यावेळी दुचाकीवरुन पडून अनुराधा जेसीबीच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडल्या. अनुराधा यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
अपघाताची माहिती मिळताच सूर्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. अनुराधा यांचे पती मिलिंद हे उद्यमनगरमधील एका खासगी कंपनीत काम करतात. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.
दरम्यान, वर्षाच्या शेवटी सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करण्यास आतुर असतानाच अनुराधा यांच्या जाण्याने पोतदार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.