Maharashtra Doctors Strike:  नव्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून (Maharashtra Resident Doctors Strike) संपावर जाणार आहेत. शनिवारपर्यंत वेळ देऊन देखील चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने उद्यापासून संपावर जाण्याच्या निर्णयावर ‘मार्ड’ (Maharashtra Association Of Resident Doctors)  ठाम आहे. त्यामुळे राज्यभरातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर संपावर जाणार आहे. तर, दुसरीकडे रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात येणार आहेत. 

काही दिवसांपूर्वीच मार्डने आपल्या मागण्या प्रशासन, सरकारसमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. एक जानेवारीपर्यंत सरकारने मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे आता मार्डचे डॉक्टर संपावर जाणार आहेत. मार्डने राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी संप करत असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय, काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरील मागण्या जोडण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी निवासी डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांवर कामाचा अधिक ताण येत आहे. सरकारला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

मार्डच्या संपात राज्यातील डॉक्टर सहभागी होणार असल्याने अनेक जिल्ह्यातील रुग्णालयातील रुग्णांचे हाल होण्याची भीती आहे. निवासी डॉक्टरांच्या संपाला बंधपत्रित डॉक्टरांच्या संघटनेने पाठिंबा दिला आहे. अतिदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचा संघटनेने इशारा दिला आहे. 

मुंबईतील केईएम, नायर, सायन, कूपर आणि जे. जे. रुग्णालयाला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेच्या सूचना देण्यात आली आहे. 

live reels News Reels

निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय?

मार्डने वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती करण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव शासन दरबारी रखडला आहे. त्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील वसतिगृहांची दुरवस्था झाली असून निवासी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची हेळसांड होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची अपुरे पदे तातडीने भरण्याची मागणी मार्डने केली आहे. त्याशिवाय महापालिका आणि सर्व शासकीय रुग्णालयात महागाई भत्ता आणि थकबाकी तत्काळ लागू करा, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्याची मागणी मार्डने केली आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here