Bhima Koregaon battle | भीमा-कोरेगाव येथील शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला करणी सेनेने विरोध दर्शविल्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता होती. करणी सेनेने याठिकाणी शौर्यदिनाऐवजी श्रद्धांजली सभा आयोजित करण्याचा इशारा दिला होता. मात्र, आतापर्यंत तरी याठिकाणी शांत वातावरण आहे. पोलिसांनी कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट दिली.

 

Bhima Koregaon
भीमा कोरेगाव शौर्यदिन

हायलाइट्स:

  • आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतिक
  • करणी सेनेचा विरोध
पुणे: कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुण्यात हजारो आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही रविवारी सकाळी विजयस्तंभाला भेट दिली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतिक आहे.या देशात हजारो वर्ष गुलामी होती.राजकीय गुलामी देखील होती.भीमा कोरेगांवच्या लढाईत ही गुलामी संपली.भारताच्या स्वातंत्र्याचा सामाजिक आणि राजकीय इतिहास येथून सुरु होतो.हजारो लोक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात.त्यामुळे आज आनंदाचा दिवस आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव येथील शौर्यदिनाला विरोध करणाऱ्या करणी सेनेचाही समाचार घेतला. करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अजय सेंगर यांनी भीमा-कोरेगाव येथे शौर्यदिन नव्हे तर श्रद्धांजली सभा व्हायला पाहिजे, असे म्हटले होते. त्यामुळे १ जानेवारीला साजरा होणाऱ्या कोरेगाव-भीमा येथील शौर्यदिनाच्या कार्यक्रमावर बंदी घाला, असेही त्यांनी म्हटले होते. एवढेच नव्हे तर आम्ही त्याठिकाणी जाऊन श्रद्धांजली सभा घेऊ, असा इशाराही करणी सेनेने दिला होता. इंग्रजांविरोधात लढताना जे शहीद झाले त्या भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी हजारो महाराष्ट्र करणी सैनिक कोरेगाव येथे जाणार आहोत. पोलिसांनी आम्हाला अडवू नये. कोरेगावचा खोटा इतिहास सांगून युवकांची माथी भडकवली जात आहेत, असा आरोप अजय सेंगर यांनी केला होता. या आरोपाला प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले. देश गुलाम का झाला? तर ते चातुर्वण्यामुळे झाले.चातुवर्णीयांमध्ये असलेला क्षत्रिय हा लढाऊ होता.तो हारला की देश हारला, लोक हारले, समाज हारला, असा समज होता. त्यामुळे कोणी काय विधान करावं ते त्याने विचारपूर्वक करावं नाहीतर ते त्यांच्याच अंगलट येते, अशी परिस्थिती आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

दरम्यान, भीमा-कोरेगाव शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला आज हजारो आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर भीमा-कोरेगाव परिसरात कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे.

कोरेगाव-भीमा शौर्यदिन का साजरा केला जातो?

१ जानेवारी १८१८ मध्ये इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या सैन्यात ही लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांनी विजय मिळवला होता. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. त्याकाळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत असे. त्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून दरवर्षी हा शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here