Maharashtra Liquor Sales Revenue Collection: कोरोना महासाथीचे संकट दूर गेल्यानंतर राज्यासह देशाचा आर्थिक गाडा पुन्हा सुरू झाला. कोरोना काळात अर्थव्यवस्थेचे चाक लॉकडाउनमध्ये रुतल्याने सरकारसमोर महसूलाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता, कोरोनानंतर आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीतही (Liquor Sales) लक्षणीय वाढ झाली आहे. मद्य विक्रीतून सरकारच्या तिजोरीत (Maharashtra Revenue) भर पडली आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात मद्य विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील 9 महिन्यात 14,480 कोटींचा महसूल मिळाला आहे. 

कोरोनाकाळात राज्यात लॉकडाउन लागू झाल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यात मद्यविक्रीलादेखील फटका बसला. कोरोना निर्बंध शिथील केल्यानंतर काही प्रमाणात मद्य विक्री सुरू झाली होती. मात्र, आता कोरोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्यामुळे मद्यविक्रीदेखील जोमाने वाढली असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. 

गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 34.5 कोटी लिटर देशी मद्याची विक्री नोंदवण्यात आली. तर,2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात राज्यात 25 कोटी लिटर मद्य विकले गेले होते. तर, सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 23.5 कोटी लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात 17.5 कोटी लिटर विदेशी मद्य विकले गेले. 

कोरोना महासाथीच्या काळात बीअरची विक्री मोठ्या प्रमाणात घटली होती. अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत सुरू होत असताना दुसरीकडे बीअरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या  महिन्याच्या कालावधीत 23 कोटी लिटर बीअरची विक्री झाल्याची नोंद आहे. तर, 2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात 21 कोटी लिटर बीअरची विक्री झाली होती. 

live reels News Reels

उच्चभ्रू वर्गाची पसंती असणाऱ्या वाइनची मागणी देखील वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या आठ महिन्याच्या या कालावधीत राज्यात 88 लाख लिटर वाइनची विक्री झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात 66 लाख लिटर वाइन विकली गेली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात वाइन विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. 

तळीरामांमुळे तिजोरीत भर

मागील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील मद्यविक्रीतून 17,117 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या केवळ आठ-नऊ महिन्याच्या कालावधीत 14,480 कोटी रुपयांची तिजोरीत भर पडली आहे. यंदा मद्यविक्रीतून 22 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, अशी अपेक्षा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here