म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सव मंडळांना गेल्या वर्षी देण्यात आलेला परवानाच यावर्षीच्या उत्सवात ग्राह्य धरण्याचा निर्णय महापालिकेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे; तसेच घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करण्याचा आग्रह महापालिकेने धरला असून, या वर्षी विसर्जन हौदांची व्यवस्था महापालिकेकडून करण्याचा येणार नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या उत्सवात प्रतिष्ठापना; तसेच विसर्जनाच्या मिरवणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेत झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीस महापौर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, ‘आरपीआय’च्या गटनेत्या सुनीता वाडेकर, बाबा धुमाळ यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘या बैठकीत निर्णय घेण्यात आले असले, तरी काही निर्णयांबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांशी बैठक आयोजित करून अंतिम निर्णय घेण्यात येतील,’ असे मोहोळ म्हणाले.

गणेशोत्सवाबद्दल घेण्यात आलेल्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या परवान्यांचा विषय निकाली काढण्यात आला आहे. २०१९ मध्ये मंडळांना मिळालेला परवानाच केवळ यंदाच नाही, तर २०२१ च्या गणेशोत्सवातही ग्राह्य धरण्यात यावा, अशी चर्चा या बैठकीत झाली. यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मांडव; तसेच स्पीकरच्या परवान्यासाठी धावपळ करावी लागणार नसल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

‘विसर्जन हौद नाहीत’

उत्सवातील संभाव्य गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची काळजी घेण्यात येत आहे. याचा भाग म्हणून गणेशमूर्तींचे सार्वजनिक विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून दरवर्षी घरगुती गणपतींसाठी तयार करण्यात येणारे विसर्जन हौद यंदा नसतील. नागरिकांनी घरगुती गणपतींचे विसर्जन घरातच करावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले. ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही मांडवातच विसर्जनाचा निर्णय घ्यावा,’ असे सांगून, राज्य सरकारने चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू नये, अशी सूचना केली आहे.

महापौर म्हणाले…

– मूर्ती खरेदीसाठी ऑनलाइन पर्यायांचा वापर करा.

– विक्रेते, पथारीवाल्यांबाबत पोलिसांशी लवकरच चर्चा होणार.

– शाडूमातीच्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करावी.

– नागरिकांनी सुरक्षित वावर या नियमाचे काटेकोर पालन करावे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here