दोन महिन्यांपासून विकास गुगलवर हत्येच्या पद्धती शोधत होता. पोलिसांना संशय येणार नाही असा मार्ग त्याला हवा होता. एका व्हिडीओमध्ये त्याला हत्येची हवी तशी पद्धत सापडली. त्यानं याच मार्गाचा वापर करत सोनियाची हत्या केली. सोनियाचं माहेर हापूडच्या आर्यनगरात आहे. तिच्या हत्येनंतर वडील त्रिलोकचंद शर्मा यांनी तक्रार दाखल केली.
सोनिया आणि विकासचा विवाह १२ वर्षांपूर्वी झाला होता. विकास आणि अमिषानं शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास गाझियाबादमध्ये हापुड चुंगी आणि डायमंड उड्डाणपुलाजवळ कारमध्ये सोनियाची गळा दाबून हत्या केली. यानंतर मृतदेह कारमध्ये ठेऊन ३ तास फिरत होते. पोलिसांना ८ वाजता घटनेची माहिती मिळाली. बाईकवरून आलेले चौघे ५० हजार रुपये लुटून घेऊन गेले अशी माहिती पोलिसांना देण्यात आली.
विकास गेल्या २ महिन्यांपासून हत्येचा कट रचत होता. त्यानं हत्येबद्दल गुगलवर बऱ्याचदा सर्च केलं आणि अनेक पद्धती वाचून काढल्या. पोलिसांनी मोबाईल तपासल्यावर ही माहिती उघडकीस आली. हत्यार कुठे मिळतं, ऑनलाईन शॉपिंग ऍपवर विष मिळतं का, असे प्रश्न विकासनं गुगलवर सर्च केले. त्याच्या मोबाईलमध्ये काही ऑडियो आणि व्हिडीओ मिळाले आहेत.
विकासच्या मोबाईलमध्ये पोलिसांना घटस्फोटाचं ऍग्रीमेंट मिळालं आहे. त्यावर सोनिया आणि विकासची स्वाक्षरी आहे. याबद्दल सोनियाच्या माहेरच्या लोकांना कोणतीच कल्पना नाही. सोनिया आणि विकास यांना तीन मुलं आहेत. आईच्या हत्येमुळे वडील तुरुंगात गेल्यानं मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.