बुलढाणा : जिल्ह्यातील अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. २०२२ या वर्षात जिल्ह्यात विविध मार्गांवर ५२७ ठिकाणी अपघात झाले होते. त्यानंतर काल नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही एका चिमुकल्याने अपघातात आपले प्राण गमावले आहेत. बोलेरो वाहनाने १४ वर्षीय बालकाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. हा अपघात बीबी ते दुसरबीड मार्गावरील धाईत यांच्या शेताजवळ झाला. राजरत्न संजय साळवे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. २० बी. डी. ७७०७ या क्रमांकाच्या बोलेरो वाहनाने राजरत्न साळवे याला धडक दिली. सदर बालक आपल्या मित्रांसोबत एका शेतामध्ये आला होता. तो रस्त्यावरून जात असताना त्याला वाहनाची जबर धडक बसली. या अपघातात जखमी झाल्याने त्याला बीबी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी राजरत्न याला मृत घोषित केले.

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कंटेनरचा भीषण अपघात, विजेच्या खांबाला दिली धडक, चालक गंभीर

बोलेरो चालक शाहरुख हसन चौधरी (रा.हिवराखंड ता. लोणार) याच्याविरुद्ध गाडी निष्काळजीपणे चालवून धडक दिल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बीबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण, पोलीस नाईक विष्णू जायभाये, पोलीस नाईक रोहिदास पांढरे करीत आहे.

दरम्यान , जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील अपघात थांबत नसताना आता जिल्ह्यातील दळणवळण असलेल्या इतर मार्गांवरील अपघाताची मालिकाही सुरू आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसालाही अपघाताने सुरुवात झाल्याने या अपघातांना आळा केव्हा बसणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here