Bhima koregaon battle anniversary | गेल्या काही दिवसांपासून करणी सेनेकडून भीमा-कोरेगाव येथील शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला विरोध केला जात आहे. याठिकाणी शौर्यदिन नव्हे तर श्रद्धांजली सभा घेतली पाहिजे, अशी मागणी करणी सेनेने केली होती. यावरुन सुषमा अंधारे यांनी करणी सेनेला फटकारले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री भीमा-कोरेगाव येथे फिरकले नाहीत, याकडेही अंधारे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

 

Sushma Andhare in Pune
कोरेगाव-भीमा शौर्यदिन

हायलाइट्स:

  • कोरेगाव-भीमा शौर्यदिन
  • चंद्रकांत पाटील यांनी घरूनच या कार्यक्रमाला हजेरी लावली होती
  • राज्यात पेशवाईचं सरकार आहे
पुणे: कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी उपस्थिती न लावल्याने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. सरकारच पेशवाईचं असेल, तर मंत्री भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन का करतील?, अशी टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, याठिकाणी त्यांच्यावर शाईफेक होऊ शकते, अशी धमकी आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या घरातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन करत कोरेगाव-भीमा लढाईतील वीरांना मानवंदना वाहिली होती. मात्र, राज्य सरकारमधील अन्य मंत्रीही कोरेगाव-भीमा येथे उपस्थित राहिले नव्हते. यावरुन सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

सरकारच पेशवाईचं असेल, तर आम्ही काय अपेक्षा करावी, या ठिकाणी राज्य सरकारमधील कोणीही मंत्री येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वात आधी पालकमंत्री म्हणून अजित पवार या ठिकाणी येऊन अभिवादन करत असत. पण आताचं सरकारच पेशवाईचं आहे, तर या पेशवाईकडून आम्ही कशी काय अपेक्षा करावी.ज्या पेशवाईचा पाडाव केल्यानंतर, हा विजय स्तंभ उभा राहिला, त्या पेशवाईचाच वसा अन वारसा चालविणारे लोकच जर या सरकारमध्ये असतील, तर त्यांनी इथे अभिवादन करण्याची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेला आता भाजपच्या गोटातून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
मी शाईच काय, पण छातीवर गोळ्याही झेलेन, पण ‘या’ एका कारणासाठी कोरेगाव-भीमाला आलो नाही: चंद्रकांत पाटील
सुषमा अंधारे यांनी विजयस्तंभाला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना करणी सेनेवरही टीकास्त्र सोडले. करणी सेनेने भीमा-कोरेगाव येथे शौर्यदिन साजरा करण्यास विरोध केला होता. त्याऐवजी याठिकाणी कोरेगाव-भीमाच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करावी, अशी मागणी करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अजय सेंगर यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचाही सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला. करणी सेनेसारख्या चिल्लर सेनेबाबत आपल्याला काही बोलायचं नाही. मात्र, या मागचे बोलविते धनी आरएसएस आणि सरकारात असलेला भाजपच आहे. भाजपामधील किमान एखाद्या जबाबदार व्यक्तीने करणी सेनेसारखी भूमिका बोलवूनच दाखवावी. मग आंबेडकरी जनता काय असते, हे तुम्हाला दाखवू, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले.

Bhima Koregaon: भीमा कोरेगावचा इतिहास खोटा असल्याचा दावा करणाऱ्या करणी सेनेला प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर

प्रकाश आंबेडकरांकडून करणी सेनेला प्रत्युत्तर

इंग्रजांविरोधात लढताना जे शहीद झाले त्या भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी हजारो महाराष्ट्र करणी सैनिक कोरेगाव येथे जाणार आहोत. पोलिसांनी आम्हाला अडवू नये. कोरेगावचा खोटा इतिहास सांगून युवकांची माथी भडकवली जात आहेत, असे वक्तव्य अजय सेंगर यांनी केले होते. या आरोपाला प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले होते. देश गुलाम का झाला? तर ते चातुर्वण्यामुळे झाले.चातुवर्णीयांमध्ये असलेला क्षत्रिय हा लढाऊ होता.तो हारला की देश हारला, लोक हारले, समाज हारला, असा समज होता. त्यामुळे कोणी काय विधान करावं ते त्याने विचारपूर्वक करावं नाहीतर ते त्यांच्याच अंगलट येते, अशी परिस्थिती आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here