सोलापुरातील राजकारणाविषयी पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवरून व्यक्तीगत राजकारण सुरू आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बंद झाला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच मोठं नुकसान होईल. त्यामुळे येथील आमदार व खासदार बदलले पाहिजे.’ दरम्यान, डिसेंबर महिन्यात राष्ट्रवादीचे आमदार शेतकरी मेळाव्याला आले असता त्यांनीही सोलापूरला काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचा खासदार व्हावा, अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे करू असे सांगितले होते. त्यानंतर आता रोहित पवारांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
किरीट सोमय्यांवर जोरदार टीका
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे दररोज पत्रकार परिषद घेत आरोप करत होते. मात्र राज्यातील सत्ता बदलल्यापासून ते पत्रकार परिषदाना दिसत नाहीत. याबाबत प्रश्न विचारताच रोहित पवार हे किरीट सोमय्यांवर बरसले. ‘ज्या वेळी किरीट सोमया यांनी आरोप केले, ज्या आमदारांवर आरोप केले, आता तेच आमदार शिंदे गटात जाऊन भाजपबरोबर आहेत. सोमय्या हे आता का शांत झाले? आधी किरीट सोमया हे टीव्हीवर येण्यासाठी नाटक करत होते का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
‘शिंदे गटाच्या आमदारांना सुरक्षा देण्यात वायफट खर्च’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शिंदे गटातील आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली. ‘सत्ताधारी पक्षातील आमदारांना आणि काही खासदारांना सुरक्षा द्यावी लागत आहे. तर मग सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा कशी करणार? राज्यात अंगणवाडी सेविकांना पगार दिला जात नाही. त्यांना आंदोलन करावं लागत आहे. अधिवेशनादरम्यान पोलिसांनी स्वतः २५ रुपये देऊन जेवण केलं. वर्षाला १५० कोटी रुपये खर्च काही विशिष्ट आमदारांच्या सुरक्षतेवर खर्च केले जात आहेत. हे सरकार लोकहितासाठी नव्हे तर स्वहितासाठी सत्तेवर आलं आहे,’ असा हल्लाबोलही रोहित पवारांनी केला आहे.