याबाबत मिळालेली माहिती अशी की, बोईसर येथील तारापूर रोडवर बँक ऑफ बडोदाची शाखा असून बँकेच्या मागील बाजूस असलेला एक्झॉस्ट फॅन काढून या बोगद्यातून ३० डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दोन चोरटे बँकेत शिरले. त्यानंतर बँकेतील २० रुपयांच्या नाण्याच्या पाच पिशव्या अशी तब्बल २ लाख रुपयांची चिल्लर चोरून चोरटे पसार झाले.
चोरीची ही घटना बँकेतील स्टोअर रूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याआधारे पोलिसांनी दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी एक दिवस आधीच या बँकेची पाहणी केली असल्याची माहितीही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय आणि १९ वर्षीय अशा दोन आरोपींना अटक केली आहे. तसंच बोईसर पोलीस ठाण्यात कलम ३८०, ४५७, ४५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास बोईसर पोलिसांकडून सुरू आहे. तसंच स्टोअर रूमसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एक्झॉस्ट फॅन ठेवणाऱ्या बँकेच्या शाखा व्यवस्थापनाचीही पालघर पोलीस अधीक्षकांनी कान उघडणी केली आहे.