Indian Science Congress Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 3 जानेवारी रोजी 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे (Indian Science Congress) दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून (ऑनलाइन) उद्घाटन करणार आहे. तसेच या संपूर्ण  उद्घाटन सत्रामध्‍ये सहभागी होणार आहेत. परिषदेचा उद्घाटन सोहळा सकाळी वाजता सुरू होईल. या परिषदेचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU) भूषवत आहे. नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

उद्घाटन सत्राला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री आणि  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शताब्दी सोहळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा समावेश आहे. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री, डॉ जितेंद्र सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए), कोलकाताच्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या वर्षीची थीम…

यावर्षीच्या विज्ञान काँग्रेसची (इंडियन सायन्स कॉंग्रेस) संकल्पना ‘महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ अशी आहे. या कार्यक्रमात आयोजित चर्चासत्रे आणि प्रदर्शने सर्वांसाठी खुली आहेत. 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या (ISC) तांत्रिक सत्रांची 14 विभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून त्याअंतर्गत विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये विविध ठिकाणी समांतर सत्रे आयोजित केली जातील. या 14 विभागांव्यतिरिक्त, महिला विज्ञान परिषद, शेतकरी विज्ञान परिषद, बाल विज्ञान परिषद, आदिवासी संमेलन, विज्ञान आणि समाज परिषद तसेच एक विज्ञान संप्रेषक परिषद देखील भरवण्यात येणार आहे.

live reels News Reels

तज्ज्ञांची उपस्थिती…

या सर्व सत्रांमध्ये नोबेल पारितोषिक विजेते; आघाडीचे भारतीय आणि परदेशी संशोधक; अवकाश, संरक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधन यासह विविध क्षेत्रातील तज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी होतील. तांत्रिक सत्रांमध्ये कृषी आणि वनीकरण विज्ञान, प्राणीशास्त्र, पशुवैद्यकीय आणि मत्स्य विज्ञान, मानववंशशास्त्र आणि वर्तन विज्ञान, रसायनशास्त्र, पृथ्वी प्रणाली विज्ञान, अभियांत्रिकी विज्ञान, पर्यावरणशास्त्र, माहिती आणि संप्रेषण विज्ञान आणि तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, गणिती शास्त्र, वैद्यकीय शास्त्र, नवीन जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र यामधील पथदर्शक आणि उपयोजित संशोधन प्रदर्शित केले जाईल.  

 ‘प्राईड ऑफ इंडिया’मध्ये…

महाप्रदर्शन ‘प्राईड ऑफ इंडिया’ या कार्यक्रमाचे खास आकर्षण आहे. या प्रदर्शनात भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे समाजासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान तसेच वैज्ञानिक क्षेत्रातील ठळक घडामोडी आणि प्रमुख उपलब्धी प्रदर्शित केल्या जातील. यासह वैज्ञानिक जगाच्या पटलावर भारतातील शेकडो नवीन कल्पना, नवोपक्रम आणि उत्पादने एकत्र आणून प्रदर्शित केल्या जाणार आहे. ‘प्राईड ऑफ इंडिया’ हे सरकार, देशभरातील कॉर्पोरेट, सार्वजनिक उपक्रम, शैक्षणिक तसेच संशोधन आणि विकास संस्था, नवोन्मेषक आणि नवउद्योजक यांचे संशोधन, कार्य आणि उपलब्धी प्रदर्शित करते.

विज्ञान ज्योत – ज्ञानाची  ज्योत

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज, भारतीय विज्ञान परिषदेची परंपरा असलेला विज्ञान ज्योत कार्यक्रम पार पडला. ‘झिरो माइलस्टोन’ येथे 400 हून अधिक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी जमले आणि या विद्यार्थ्यांनी खास टोप्या तसेच टी-शर्ट परिधान करून विद्यापीठ परिसराकडे रॅली काढली. या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात वैज्ञानिक विचार अंगीकारण्याची प्रतिज्ञा घेतली. विज्ञानाचा अभ्यास केवळ शिक्षणातील एक विषय म्हणून न ठेवता आपण जीवनात जे काही करतो त्याचा एक भाग बनवा, असे आवाहन भारतीय विज्ञान परिषद संघटनेच्या (आयएससीए ) सरचिटणीस, डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांनी केले. ऑलिम्पिक ज्योतीच्या धर्तीवर ‘विज्ञान ज्योत – ज्ञानाची  ज्योत’ – कल्पना साकारण्यात आली आहे. समाजात, विशेषतः तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती जोपासण्यासाठी समर्पित अशी ही एक चळवळ आहे. ही ज्योत विद्यापीठाच्या परिसरामध्ये स्थापित करण्यात आली असून ती 108 व्या भारतीय विज्ञान परिषदेच्या समाप्तीपर्यंत तेवत राहील. 

PMO कार्यालयात अनेक तक्रारी

भारतीय विज्ञान काँग्रेसला देश-विदेशातील संशोधक व तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहतील. उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असल्याने उत्सुकता होती. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान समृद्धी महामार्गासह अन्य कार्यक्रमांसाठी नागपूरला येऊन गेले. शिवाय विद्यापीठातील अनेक गैरप्रकार आणि कुलगुरूंच्या विरोधातही पंतप्रधान कार्यालयाला तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे स्वत: पंतप्रधान मोदी येणार की दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित राहणार ही चर्चा शैक्षणिक वर्तुळात होती. मात्र, आयोजन समितीकडून प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी येणार नसल्याचे अधिकृत जाहीर करण्यात आल्याने संभ्रम दूर झाला.

ही बातमी देखील वाचा…

आयुर्वेद एमडीच्या जागांमध्ये कपात; 249 पैकी फक्त 160 जागांवरच होणार प्रवेश

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here