म. टा. वृत्तसेवा, : रेल्वे रुळांशेजारील टेम्बोडे येथील कारशेडच्या आवारात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांना त्या ठिकाणी कामास असलेल्या सुरक्षारक्षकाने विरोध केल्याने खेकडे पकडण्यासाठी आलेल्या तरुणांनी सुरक्षारक्षकावर रॉकेल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

या घटनेत सुरक्षारक्षक गंभीररित्या होरपळला असून त्याला ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. खांदेश्वर पोलिसांनी या घटनेतील आरोपी तरुणांवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

देविदास उगले (३०) असे सुरक्षारक्षकाचे नाव असून तो कळंबोली भागात आई-वडिलांसह राहण्यास आहे. देविदास आणि त्याचे वडील हे दोघेही खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. देविदास सध्या कळंबोली रेल्वे रुळांशेजारील टेम्बोडे शिवारातील रेल्वे कारशेडमध्ये रात्रपाळीवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. सोमवार रात्री तो कामावर गेला असताना रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोघे तरुण कारशेड आवारात जळता टेंभा घेऊन खेकडे पकडण्यासाठी आले होते. त्यामुळे देविदासने त्यांना हटकले. दोघा तरुणांनी देविदाससोबत वाद घातला. त्यांच्यात झटापट झाल्यानंतर दोघांनी सोबत आणलेले रॉकेल देविदासच्या अंगावर टाकून त्याला पेटवून दिले. त्यानंतर पलायन केले.

या घटनेत देविदास गंभीररित्या भाजल्याने तो त्याच ठिकाणी बेशुद्ध पडला. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर देविदासने त्याच अवस्थेत आपले घर गाठले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याला प्रथम एमजीएम रुग्णालयात व त्यानंतर ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात दोघा तरुणांविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक वैभव रोंग्ये यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here