बुलढाणा : एखादा ट्रक अनियंत्रित होऊन जेव्हा गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या दुसऱ्या ट्रकला भरवस्तीत धडक देतो, तेव्हा तेथील नागरिकांच्या काळजाचा कसा थरकाप उडतो, हे दाखवणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घडली आहे. भरधाव अनियंत्रित ट्रकने सुरुवातीला एका सायकलस्वाराला, नंतर रस्त्याच्या दुभाजकावरील विद्युत खांबाला आणि गॅस सिलेंडरच्या ट्रकला धडक दिली. यावेळी ट्रकमधील गॅस गळती झाल्याने पोलिसांनी सदर ट्रक तातडीने सुरक्षितस्थळी हलवला. यावेळी अनियंत्रित झालेला ट्रक खामगाव-नांदुरा रस्त्यावरील एका हॉटेलसमोर उलटला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात ते ८ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात ट्रक चालकासह एक जण जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथून एम. एच. ४० ए. के. ४४४७ क्रमांकाचा ट्रक नांदूरकडे राख घेऊन जात होता. दरम्यान जलंब नाक्यासमोर ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने सुरुवातीला सुटाळा येथील राजू जानकीराम बगाडे या सायकलस्वारास धडक दिली. त्यानंतर खामगाव ते सुटापर्यंतच्या रस्ता दुभाजकावरील विद्युत खांबांना धडक दिली आणि शेवटी एम. एच. ३७ टी ०२७१ या सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या एका बाजूला धडक देऊन अनियंत्रित झालेला ट्रक रस्त्यावर उलटला.

दिल्लीत दुर्घटनेच्या वेळी २० वर्षीय तरुणी स्कूटरवर एकटी नव्हती, पोलीस तपासात नवा ट्विस्ट

या अपघातामुळे खामगाव-नांदुरा रस्त्यावर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त ट्रकमधील चालकाला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले आणि तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवले. ज्ञानेश्वर मुकिंदा अंमलकार (वय ४२, राहणार- काळेगाव, तालुका खामगाव) असं जखमी चालकाचं नाव असून वाहक अवधेश प्रताप (वय ३४, राहणार- उत्तर प्रदेश) किरकोळ जखमी झाला आहे. दुसरीकडे, जखमी सायकलस्वाराला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दरम्यान, भरधाव ट्रकने धडक दिल्याने सिलेंडरच्या ट्रकमधील काही सिलेंडरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे घटनास्थळी मोठी धावपळ उडाली. शहर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. विलंब न लावता सिलेंडरच्या ट्रकला सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे खामगाव-नांदुरा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here