मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर विविध विभागांमध्ये मोठे फेरबदल होत असल्याचं चित्र आहे. पोलीस प्रशासनातही बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा तडाखा सुरू आहे. अशातच आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एटीएसच्या प्रमुखपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर राहिलेल्या देवेन भारती यांना सामावून घेण्यासाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद तयार करण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलं आहे.

‘देवेन भारती यांच्या नियुक्तीची पुष्टी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याने भारती यांची मुंबई शहराच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार असून त्याबाबतचे आदेशही लवकरच निघतील, अशी माहिती दिली,’ असा दावा ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात करण्यात आला आहे.

दोन मिनिटांत येतो सांगून सुधीर मुनगंटीवारांनी नड्डांसमोर थाप मारली; अहिरांच्या घरी जाणं टाळलं

फडणवीस सरकारमध्ये भारतींचा बोलबाला

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१९ या काळात देवेन भारती यांच्या खांद्यावर अनेक महत्त्वाच्या पदांची धुरा सोपवण्यात आली होती. सुरुवातीला सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) या पदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या भारती यांना नंतर अतिरिक्त डीजीपी म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात हलवण्यात आले. लोकसभा निवडणूका जाहीर होताच एकाच पदावर तीन वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. पण भारती यांचा सक्षम अनुभव लक्षात घेता त्यांना या आदेशातून वगळण्यासाठी राज्य सरकारने खूप प्रयत्न केले. सरकारची विनंती मान्यही करण्यात आली. पण निवडणुकीच्या वेळी पुन्हा निवडणूक आयोगाने बदलीचे आदेश दिल्याने भारती यांना त्यावेळी तूर्त आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

दरम्यान, राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर फडणवीसांच्या मर्जीतील समजल्या जाणाऱ्या भारती यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली होती. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्याने देवेन भारती यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here