लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादीकडून २००४ मध्ये मावळ लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी शेकापच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र त्या निवडणुकीत जगताप यांचा पराभव झाला. २००९ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला आणि लक्ष्मण जगताप पहिल्याच निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवून ते आमदार झाले.
अजित पवारांचे निकटवर्तीय ते देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू
राजकारणात काळानुसार समीकरणे बदलतात, असं म्हटलं जातं. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांचे सर्वांत विश्वासू नेते अशी ओळख असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी भाजप प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांचंही मन जिंकलं. राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेली झालेली राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक महाविकास आघाडीसह भाजपने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या चुरशीच्या निवडणुकीत एका-एका मताला महत्व प्राप्त झालेलं असताना लक्ष्मण जगताप यांनी आजारी असतानाही मतदानासाठी हजेरी लावली आणि भाजपच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राज्यसभेची तिसरी जागा जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी हा विजय लक्ष्मण जगताप आणि भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता.