मिनीनाथ बोडखे यांनी बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घरी येऊन बोडखे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. बोडखे कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. बोडखेंना उपचारासाठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजी सरपंच बोडखे हे शासकीय कंत्राटदार होते. त्यांचे सर्व व्यवहार संतोष उत्तमसिंग राजपूत व बाळू नलावडे हे यांच्यामार्फत चालू होते. दहा दिवसांपूर्वी राजपूत व नलावडे यांनी बोडखे यांच्या घरी येऊन तुझ्याकडील पैसे देऊन टाक, असे म्हणत शिवीगाळ करून निघून गेले. बोडखे यांनी राजपूत याच्याकडून पाच-सहा वर्षांपूर्वी अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. वेळोवेळी व्याजासह परतफेड करत त्यांनी ४५ लाख रुपये राजपूतला परत केले. तरीही त्याने पैशांचा तगादा लावत होता. त्याचप्रमाणे बाजारसावंगी येथील बाळू नलावडे आणि बोडखे यांनी भागिदारीत खडी क्रेशर मशीन चालविण्यासाठी घेतले होते. नलावडे तिकडे परस्पर खडी विकून पैसे मिळवत होता आणि बोडखे यांच्याकडे जास्त पैसे निघाले म्हणून पैशांचा तगादा करत होता. या त्रासामुळे बोडखेंची मानसिकता प्रचंड खराब झाली होती. नलवडे यांच्याकडे सुरक्षा ठेव म्हणून सही केलेले कोरे ठेवले होते. नलावडेने हे चेक बँकेत टाकले आणि ते बाउन्स झाल्याने तो बोडखेंना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करत होता, असा आरोप आहे. तसेच बोडखे यांनी त्यांचा हायवा व जेसीबी नलावडेला दिला होता. ते वर्षभर वापरून त्याने पैसाही कमावला. तसेच वेरूळ येथील सचिन अजमेरा यांनी सात एकर शेतजमीन रजिस्ट्री करून दिली होती. या जमिनीच्या व्यवहारातून मिळालेले पैसे राजपूतला दिले होते. राजपूत व नलावडे यांना खूप वैतागलो असून आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे सांगत त्यांनी पत्नीला खासगी सावकारांची माहिती दिली होती. राजपूत व नलावडे विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलसि निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगवान झरेकर तपास करत आहेत.
चित्रफितीत घेतली नावे
राधाकृष्ण उर्फ पोपट बोडखे यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या मोबाइलवर चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्या चित्रफितीनुसार, वारंवार मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करून आत्महत्या करण्यास भाग पाडणारे संतोष राजपूत, बाळू नलावडे यांची नावे आहेत. याशिवा. एक शाखा अभियंता, तसेच उसनवारी पैसे घेतलेल्या अनेक लोकांची व त्यांच्याकडे येणे बाकी असलेल्या रकमेचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
सावकाराच्या घराची झडती
पोलिस निरीक्षक मेहेत्रे यांनी या घटनेची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाला कळविली. त्यानंतर गल्लेबोरगाव येथील संतोष राजपूत यांच्या घराची झडती पोलिस बंदोबस्तात घेण्यात आली. या झडतीमध्ये या व्यवहारासंबंधी अथवा इतर शेतकऱ्यांसंबंधी काही आक्षेपार्ह कागदपत्र मिळाले की नाही याची माहिती मिळू शकली नाही.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times