Pune Koyta Gand : कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या पाच जणांना (Pune crime) पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 5 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या 5 जणांपैकी काही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जानेवारी रोजी काही तरुणांची आपापसात किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाचा मनात राग ठेऊन या आरोपींनी नानापेठेतील परिसरात जाऊन हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी परिसरात दहशत निर्माण केली होती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. या सगळ्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्या सीसीटीव्हीच्या साह्याने पोलिसांनी या पाच जणांना अटक केली आहे गगन मिशन (19), अमन खान (22), अर्सालान तांबोळी (27), मंगेश चव्हाण (24), गणेश पवार (24) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोयता गॅंगची दहशत कायम

पुण्यात कोयता गॅंगच्या दहशतीत वाढ झाल्याचं चित्र आहे. रोज शहरात किमान दोन घटना घडल्याचं समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वीच सिंहगड लॉ कॉलेज रोडवर काल (28 डिसेंबर) दोन तरुणांनी हातात चाकू सुरे घेऊन परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना भोसकले होते. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखवली जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात एक जण जखमी देखील झाला आहे. जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी या दोघांना पाठलाग करुन पकडले, मात्र यातील एकाने पळ काढला. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन असल्याचे समजते दुसऱ्या आरोपीचे नाव करण दळवी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारांना हलक्यात घेणार नाही

कोयता गॅंगच्या दहशतीचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यांनी या सगळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा किंवा तडीपार करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांनी पहारा देण्यास सुरुवात केली होती. मात्र ही गॅंग शहरातील सगळ्यात परिसरात सक्रिय झाली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना या गॅंगवर कारवाई करण्याचं मोठं आव्हान आहे. कोणत्याही गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारांच्या दहशतीमुळे नागरिकांनी न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

live reels News Reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here