मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम भागात ही घटना घडली आहे. देविदास विनायक जाधव (वय ३५) असं मृत ट्रेनरचं नाव आहे. यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंटमध्ये ते राहत होते. आज सकाळी देविदास जाधव यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.
जाधव यांना नेमकं काय होतंय, हे कुणालाच कळेना. त्यामुळे तातडीने घरच्यांनी धाव घेतली. देविदास यांना बेशुद्धावस्थेत घरच्यांनी तसेच इमारतीमधील लोकांनी नालासोपारा येथील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले.
मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत विनायक जाधव हे एक जिम ट्रेनर म्हणून काम करत होते. नालासोपारा पश्चिम नाळा डिसिल्वानगर येथील ‘द फिटनेस कार्डेस’ या जिममध्ये तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. एका जिम ट्रेनरचा असा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.