दराडे हे अनेकदा कार्यकर्त्यांच्या व नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने कुठलीही लक्षणे नसताना केवळ शंकानिरसन म्हणून त्यांनी प्रवरा येथील एका खासगी लॅबमध्ये आपल्या स्वॅबची तपासणी केली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह दाखवला गेल्याने संपूर्ण कुटुंबालाच हादरा बसला. यानंतर दराडे यांनी मुंबईला धाव घेतली आणि फोर्टिस रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले. या रुग्णालयात दराडे यांचा स्वॅब घेऊन पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. अहवाल निगेटिव्ह आल्याने रुग्णालयाच्या वतीने आमदार दराडे यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला.
वाचा:
आमदार नरेंद्र दराडे यांचा प्रारंभीच्या तपासणीत अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने येथील ग्रामीण जिल्हा उपरुग्णालयाच्या वतीने तातडीने दराडे यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह संपर्कात आलेले शिक्षक अशा एकूण २२ जणांचे स्वॅब घेऊन ते शासकीय लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे मंगळवारी अहवाल प्राप्त होताना त्यातील ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण दराडे कुटुंबालाच हादरा बसला होता. बरोबरच मनस्ताप देखील झाला. करोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर एकालाही करोनाची लक्षणे नसल्याने सर्वांनी बुधवारी लागलीच पुन्हा खासगी लॅबमध्ये आपले स्वॅब तपासणीसाठी दिले होते. त्याचे अहवाल आज सकाळी प्राप्त होताना सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. अहवाल निगेटिव्ह आल्याने दराडे कुटुंबासह समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times