पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच एक धक्कादायक घटना घडली आहे. कोंढव्यातील एनआयबीएम परिसरातील मोकळ्या मैदानात एका महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर दारू मागितल्याने या महिलेचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट पाच आणि कोंढवा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

जैद आसिफ शेख (वय २०, रा. कोंढवा) आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. मेफेर सोसायटीच्या समोरील मोकळ्या मैदानात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह मिळून आल्याची माहिती कोंढवा पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली होती. गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलीस तपास करत असताना संशयित आरोपी कौसरबाग भागात असल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आम्ही मोकळ्या जागेत झाडाआड बसलो होतो. तेव्हा तिथे आलेल्या महिलेने दारू द्या, म्हणून वाद घातला.

भांडणात तिला धक्का मारल्याने ती खाली पडली. तिच्या डोक्यात दगडाने घाव केला. तिचा मृत्यू झाल्याच्या भीतीने आम्ही पळ काढला, अशी कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर आरोपी शेख यास अटक करण्यात आली. महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती युनिट पाचचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here