Maharashtra Politics | काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉमच्या उद्घाटनच्या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर दिसून आले होते. त्यावेळी दोघांकडूनही ठाकरे गट आणि वंचितच्या युतीचे संकेत देण्यात आले होते. मध्यंतरी दोन्ही नेत्यांमध्ये युतीविषयी सविस्तर चर्चाही झाली होती. ही बोलणी आता अंतिम टप्प्यात आली आहेत. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी BMC निवडणुकीत ठाकरे गट सोडेल तितक्या जागांवर आम्ही लढू, असे म्हटले आहे.

हायलाइट्स:
- वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होणार
- आम्ही ८३ जागांवर उमेदवार उभे करायचे ठरवले होते
- पण आता शिवसेना सोडेल तितक्या जागांवर लढण्याची आमची तयारी
यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने BMC निवडणुकीत ८३ जागांवर उमेदवार उभे करायचे ठरवले होते. मात्र, आता ठाकरे गटाशी युती झाल्यामुळे ते जितक्या जागा सोडतील, त्या जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आता उद्धव ठाकरे हा प्रस्ताव मान्य करुन अधिकृतरित्या युतीची घोषणा कधी करणार, ते पाहावे लागेल. उद्धव ठाकरे यांच्याकडून यासंदर्भात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी दाखवल्यास वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतात, हे पाहावे लागले. परंतु, प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानुसार महाविकास आघाडीत वंचितला सामावून घेण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे वंचित, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र निवडणूक लढण्यास राजी करु शकतात का, हे पाहावे लागेल.
शिवसेना (ठाकरे गट) आणि आमच्यात जागा वाटपाचे कोणतेही भांडण नाही. आमचा एकही नेता तपासयंत्रणांच्या रडारवर नाही. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीचे भविष्य मला स्थिर वाटत असल्याची टिप्पणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी-वंचितची युती होऊ नये, यासाठी प्रयत्न करतील: प्रकाश आंबेडकर
महाविकास आघाडीत वंचित बहुजन पक्षाचा समावेश होतो असे दिसल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून राजकीय खेळी खेळून या सगळ्यात आडकाठी आणू शकतात, अशी शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविली. देवेंद्र फडणवीस हे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाव्या दाबतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनीही स्वतंत्रपणे लढावे, यासाठी फडणवीस पडद्यामागून प्रयत्न करतील, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.