भारतात गेल्या २४ तासांमध्ये करोनाबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण गेल्या २४ तासांमध्ये ४५, ७२० करोनाचे रुग्ण सापडल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर एकाच दिवसात करोनामुळे १,१२९ लोकांचा मृत्यू झाल्याचेही आता समोर आले आहे. आतापर्यंत भारतामध्ये १२,३८, ६३५ लोकांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर आतापर्यंत करोनामुळे २९, ८६१ लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भारतासाठी ही चिंतेची बाब आहे.
भारतामध्ये जर परिस्थिती अशीच खालावत राहिली तर ‘भारतात दिवसाला एक लाख करोनाचे रुग्ण सापडू शकतात’ अशी चिंता भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगने व्यक्त केली आहे. याबाबत त्याने एक ट्विट केले आहे. कालच्या दिवसभरात किती लोकांना करोना झाला आणि किती लोकांचा करोनामुळए मृत्यू झाला, याबातचे ट्विट ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने केले होते. या ट्विटचा दाखला देत हरभजनने चिंता व्यक्त केली आहे. हरभजन म्हणाला की, ” हे असंच सुरु राहिलं तर भारतात लवकरच एका दिवसात एक लाख रुग्णही सापडू शकतात… कोणाला काळजी आहे का? ”
हरभजनने आपल्या ट्विटमध्ये चिंता तर व्यक्त केलीच आहे. पण त्याने सरकारवर टीकाही केल्याचे दिसत आहे. कारण सध्याच्या घडीला देशभरात करोनामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामध्येच मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण पाहायला मिळत आहेत.
काही ठिकाणी तर करोनाच्या रुग्णांना बेडही मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा पुरवण्यात सरकार कितीही प्रयत्न करत असली तरी ती तोकडी असल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता करोना सर्वांची पाठ सोडणार तरी कधी? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. करोनावर लवकरच औषध तयार होणार असल्याचे म्हटले जात आहे. काही औषधांची चाचणीही सुरु आहे. जेव्हा करोनावरील औषध सापडेल तेव्हा परिस्थिती हळूहळू सामान्य होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times