Pune Dr. ganesh Rakh : पुण्यातील डॉ. गणेश राख (Pune) यांनी  बेटी बचाओ जनआंदोलनची सुरुवात 3 जानेवारी 2012 ला सुरुवात केली. त्यांची ही यात्रा आता कश्मिरमध्ये पोहचली आहे. त्यांच्या या बेटी बचाव यात्रेत अनेक (kashmir) कश्मिरी महिला सहभागी झाल्या आहेत. बेटी बचाओचा नारा देत हजारो काश्मिरी मुली आणि महिला कश्मिरमधील कुपवाडामधील रस्त्यावर एकत्र आल्या आहेत. पुण्यातील एका डॉक्टरच्या हाकेला कश्मिरी महिला एकत्र आल्याने डॉक्टरांचं सगळीकडे चांगलच कौतुक होताना दिसत आहे.  

11 वर्षांपूर्वी पुण्यातून झाली होती सुरुवात

डॉ. गणेश राख यांनी पुण्यात त्यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये अकरा वर्षांपूर्वी बेटी बचाओ जनआंदोलनाची सुरुवात केली होती. मुलगी झाल्यास प्रसुती मोफत करतात आणि मुलीच्या जन्माचे हॉस्पिटलमध्ये केक कापून, मिठाई वाटून, सर्वत्र फुलांचा वर्षाव करून स्वागत करतात, असं कार्यक्रमाचं स्वरुप होतं. गेल्या अकरा वर्षात मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये 2450 मुलींची मोफत डिलिव्हरी झाली आहे आणि त्या सर्वांच्या जन्माचे स्वागत करण्यात आले आहे. 

4 लाखांपेक्षा अधिक डॉक्टरांचा समावेश

काहीच महिन्यात आंदोलन देश विदेशात पसरले. या आंदोलनात जगभरातून 4 लाखा पेक्षा अधिक खाजगी डॉक्टर्स,  13 हजार सामाजिक संस्था आणि 25 लाखांपेक्षा अधीक स्वयंसेवक सहभागी आहेत. हे सगळे आपल्या क्षेत्रात मुलींसाठी योगदान देत आहेत.   बेटी बचाओ जन आंदोलनाच्यावतीने आशा प्रकारच्या एक हजारपेक्षा अधिक रॅली आणि कार्यक्रम देश विदेशात घेतले आहेत. कुपवाडा (काश्मीर) मधील कार्यक्रमाला कडाक्याच्या थंडीत काश्मिरी मूली आणि महिलांची उपस्थिती आणि उत्साह प्रचंड प्रमाणात होता. या रॅलीचं आयोजन कुपवारा कमिशनर ऑफिस, कुपवारा जिल्हा आरोग्य विभाग,शक्ती मिशन, आशा वर्कर यांनी केलं होतं.

कशी झाली होती  मुलगी झाल्यास प्रसूति मोफत उपक्रमाची सुरुवात?
2011 मध्ये सुनिता (नाव बदललेलं आहे) नावाची गरोदर महिला माझ्याकडे प्रसुतीसाठी आली होती. त्यांच्या कुटुंबीयांना मुलगाच हवा होता. मुलगा झाला नाही तर माझा छळ केला जाईल, असं सुनिता सांगत होती. त्यामुळे अगदी प्रसुतीच्या वेळी देखील सुनिताने आम्हा सगळ्यांना मुलगाच झाला पाहिजे, असं कडक शब्दांत सांगितलं. मात्र सुनिताला काही वेळातच कन्यारत्न प्राप्त झालं. तीन दिवसापर्यंत आम्ही सुनिताला मुलगी झाल्याचं सांगितलं नव्हतं. तिचं कुटुंब देखील नाराज होऊन दवाखान्यात सुनिताला भेटायला आलं नव्हतं. शिवाय तोपर्यंत कोणी तिच्या उपचाराचे पैसेही दिले नव्हते. तिच्या प्रसुतीच्या असह्य वेदना आणि तिचा मानसिक त्रास पाहता आम्हीच तिच्या लेकीचं सेलेब्रेशन केलं. मी डॉक्टर मामा झालो तर आमच्यातील काही नर्स आजी, मावशी झालो आणि दवाखान्यातच तिला कुटुंब असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी मुलगी होणं लोकांसाठी इतकं त्रासदायक का असू शकतं? असा प्रश्न मला पडला, त्याचवेळी लेक झाली तर बिल न घ्यायचा असा निर्णय मी घेतला, असं डॉ. गणेश राख यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 

live reels News Reels

आणखी वाचा:

PHOTO : लेकीच्या जन्माचं भव्य स्वागत; हत्तीवरुन जिलेबी वाटली अन् गावजेवण दिलं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here