मुंबई: उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणूक आकर्षिक करण्यासाठी मुंबईतील उद्योजकांची भेट घ्यायला आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रोड शो वरुन वादाला तोंड फुटले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ हे ताज हॉटेलसमोर रोड शो करणार असल्याचे सांगितले. मात्र, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अशा रोड शो ची गरज आहे का? या माध्यमातून भाजप मुंबईत शक्तीप्रदर्शन आणि राजकारण करू पाहत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून काढण्यात येणाऱ्या रोड शोवर टीका केली. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या विकासासाठी मुंबईतील उद्योगपतींना भेटायला आले असतील, तर त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र, ते गुंतवणुकीसाठी रोड शो करणार असतील, तर ते आश्चर्यजनक आहे. या रोड शो ची गरज काय? त्यांनी आपल्या राज्यात उद्योग जरुर न्यावेत, पण महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योगधंदे उत्तर प्रदेशात जाता कामा नये, असे संजय राऊत यांनी म्हटले.

योगी आदित्यनाथ यांचा मुंबईतील रोड शो भाजपला मान्य असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दाव्होस परिषदेसाठी जातील तेव्हा तेदेखील तेथील रस्त्यांवर रोड शो काढणार आहेत का?, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला. शिंदे-फडणवीस गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी रोड शो काढणार नसतील तर मग मुंबईत योगींच्या रोड शोची गरजच काय? राजकारणाचे हे धंदे बंद करा, असे संजय राऊत यांनी खडसावून सांगितले.

मी तुमच्यासारखा पळपुटा नाही, पक्षासाठी पुन्हा तुरुंगात जायची तयारी; संजय राऊतांनी केसरकरांना फटकारले

बॉलिवूड इंडस्ट्री युपीला नेणे सोपे नाही, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित तिकडे राहायला तयार होतील का?: संजय राऊत

योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारायची असेल तर त्यांचे स्वागत आहे. त्याला आमचा आक्षेप नाही. परंतु, महाराष्ट्रातील फिल्म इंडस्ट्री कोणी खेचून उत्तर प्रदेशला नेऊ शकत नाही. तसं असेल तर अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासारखे सिनेकलावंत लखनऊ किंवा उत्तर प्रदेशाच्या इतर शहरांमध्ये राहायला जाणार आहेत का, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut: शिंदे गट म्हणजे टोळी, असल्या टोळ्या गँगवॉर नाहीतर एन्काऊंटरमध्ये मारल्या जातात: संजय राऊत

योगी आदित्यनाथांकडून मुंबईतील उद्योजकांची भेट

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईतील रोड शोपूर्वी ते आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, पिरामल एंटरप्राइझ लि.चे अध्यक्ष अजय पिरामल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे एमडी सज्जन जिंदाल, टोरेंट पॉवरचे एमडी जिनल मेहता आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांची भेट घेणार आहेत. संभाव्य गुंतवणूकदारांना उपलब्ध संधी आणि उत्तर प्रदेशातील अनुकूल व्यावसायिक वातावरणाची ओळख करून देण्यासाठी देशातील नऊ शहरांमध्ये रोड शो आयोजित केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून योगी आदित्यनाथ आज मुंबईत रोड शो करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here