मुंबई : महाराष्ट्र फाऊण्डेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचं अमेरिकेत निधन झालं. अमेरिकेत राहून मराठी संस्कृती फुलवण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. महाराष्ट्रातील सांगलीहून अमेरिका गाठल्यानंतर कर्तृत्व गाजवणारा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सत्तरच्या दशकात अमेरिकेत गेलेल्या तरुणांमध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जाई. सांगली ते फ्लोरिडा व्हाया मुंबई असा त्यांचा प्रवास होता.
१९७० च्या आसपास म्हणजे ५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून अमेरिकेत जाऊन कर्तृत्व गाजवणाऱ्या तरुणांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे सुनील देशमुख. त्यांनी विशेष पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने ११९४ पासून मराठी साहित्य पुरस्कार तर १९९६ पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार प्रदान केले गेले. दरवर्षी दहा ते अकरा याप्रमाणे मागील २८ वर्षे पुरस्कार नित्यनेमाने दिले जात आहेत.