हा प्रकार २६ नोव्हेंबर २०२२ रोजी घडला होता. न्यूयॉर्क ते दिल्ली प्रवास करणाऱ्या विमानात एका विकृत मद्यधुंद पुरुष प्रवाशाने महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली होती. एअर इंडियाने या प्रवाशावर ३० दिवसांची हवाई प्रवासबंदी घातली आहे. तसेच ही परिस्थिती हाताळण्यात कर्मचारी वर्गाकडून कसूर झाली का? हे तपासून पाहण्यासाठी अंतर्गत समितीही नेमण्यात येणार असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
‘डीजीसीए’ने या घटनेबाबतचा अहवाल विमान कंपनीकडून मागविला आहे. यात निष्काळजी दाखविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. पोलिसांकडे या घटनेविषयी तक्रार करण्यात आली आहे. या घृणास्पद प्रकाराची एअर इंडियानेही गंभीर दखल घेतली आहे. त्या प्रवाशावर ३० दिवसांची हवाई प्रवासबंदी घालण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी या प्रकाराची माहिती ‘डीजीसीए’ला देण्यात आली आहे, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले. तथापि, ही हवाई प्रवासबंदी नेमकी कधीपासून घालण्यात आली आहे, हे सांगण्यास एअर इंडियाने नकार दिला. या प्रकरणाचा तपास आणि अहवाल देण्याच्या प्रक्रियेदरम्यान पीडित प्रवासी आणि तिच्या कुटुंबीयांच्या नियमित संपर्कात असल्याचे विमान कंपनीने म्हटले आहे.