काल बुधवारी अमेरिकेत ७१ हजार ९६७, ब्राझिलमध्ये ६५ हजार ३३९ आणि दक्षिण आफ्रिकेत १३ हजार १५० रुग्ण सापडले. भारतात एकूण ४५ हजार ७२० रुग्ण आढळले. त्यात १० हजार ५७६ फक्त महाराष्ट्रातीलच आहेत. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ३ लाख ३७ हजार ६०७वर गेली आहे. त्यातील १ लाख ८७ हजार ७६९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १२ हजार ५५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात दररोज सरासरी ८ ते १० हजार रुग्ण सापडत आहेत. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे ५५ टक्के रुग्ण बरेही होत आहे. मात्र, दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी करोनाचा फैलाव झाला नव्हता अशा ठिकाणीह करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून आलं आहे.
करोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या पाहता जगातील पाच देशांना महाराष्ट्राने मागे टाकलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत ५ हजार ९४०, पाकिस्तानात ५ हजार ६७७, जर्मनीत ९ हजार ८१२, चिलीमध्ये ८ हजार ७२२ आणि कोलंबियामध्ये ७ हजार ३७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात १२ हजार ५५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या रशियातील करोना रुग्णांच्या संख्ये एवढीच आहे. तर मुंबईत कालपर्यंत करोना रुग्णांची संख्या १ लाख चार हजार ६७८ झाली असून मुंबईत आतापर्यंत ५ हजार ८७५ जण दगावले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times