Nanded News Updates: नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिर्गे यांनी अर्धापूर येथील एका संस्थेला नियमबाह्य नैसर्गिक वर्ग वाढ करण्याची मान्यता दिली आहे. एवढेच नाहीतर ती फाईलच गहाळ केल्याने शासनाची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार लातूरच्या उपविभागीय कार्यालयाला समजताच त्यांनी पुणे येथील मुख्य कार्यालयाला तशी माहिती कळवल्यानंतर त्या कार्यालयाच्या आदेशावरून अखेर वजिराबाद पोलीस ठाण्यात डॉ. सविता बिर्गे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नांदेड जिल्हा परिषद चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे सविता बिर्गे यांना काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये त्याच पदावर असताना चार लाख रुपयाची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले होते.

नांदेड जिल्हा परिषद नेहमीच चर्चेत

नांदेडच्या प्रशासक असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक विभागात असा अनागोंदी कारभाराचे दर्शन नेहमीच पहायला मिळत आहे. माळेगावच्या यात्रेनंतर पशुसंवर्धन विभाग, त्यानंतर जलजीवन मिशन आणि आता तर चक्क शिक्षण विभाग चर्चेत आला आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता  बिर्गे यांनी 28 डिसेंबर 2016 ते आजपर्यंत आपल्या कार्यकाळात विविध कारनामे केल्याचा ठपका ठेवून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अर्धापूर येथील श्री साई शिक्षण संस्था लोणी बुद्रुक तालुका अर्धापूर संचलित आदर्श प्राथमिक विद्यालय अर्धापूर या शाळेत मराठी माध्यमासाठी पाचवी ते सातवी वर्गाला नैसर्गिक वर्ग वाढ करण्यास मान्यता आदेश निर्गमित करताना शिक्षण अधिकारी प्राथमिक बिर्गे यांच्या कार्यालयाने सत्यतेबाबत कोणतीही खातरजमा केली नाही. त्यांच्या कार्यालयाकडून खातरजमा करण्याबाबत विचारलं असता संचिका गहाळ झाली असल्याचं म्हटलं आहे. 

बिर्गे यांनी शासनाची फसवणूक केली हे तपासणीत निष्पन्न

आदेशाचा गैरफायदा संबंधित संस्थेला व्हावा या हेतूने डॉ. सविता बिर्गे यांनी सदरचे आदेश निर्गमित करून शासनाची फसवणूक केली हे तपासणीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची चौकशी मागील अनेक वर्षापासून सुरू होती. लातूरच्या शिक्षण उपविभागीय कार्यालयाला पुणे येथील आयुक्त सुरज मांढरे यांनी पत्रव्यवहार करून या संबंधात कारवाईचे आदेश दिले होते. अखेर यावरून अधीक्षक, शिक्षण संचालनालय पुणे दीपक  पाटील यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाला असला तरी सविता बिर्गे यांना अद्याप पालिसांनी ताब्यात मात्र घेतलेले नाही.

live reels News Reels

ही बातमी देखील वाचा

Nanded: नांदेडच्या पोलीस दलातील फौजदाराची गोदावरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; माजी सैनिकाने वाचवला जीव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here