मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एक शहाणे आणि सरळमार्गी नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्र भाजपमधील फुटकळ नेत्यांचा सल्ला ऐकून स्वत:ची अप्रतिष्ठा करुन घेऊ नये, असा सल्ला शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून देण्यात आला आहे. कालच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत आयोजित करण्यात रोड शोवर टीका केली होती. उत्तर प्रदेशात उद्योगधंदे आकर्षित करण्यासाठी योगींनी प्रयत्न जरुर करावेत. पण रोड शो काढून राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र, आता त्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘सामना’च्या अग्रलेखातून योगी आदित्यनाथ यांना सावधानतेचा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशच्या विकासात मुंबई-महाराष्ट्राने नेहमीच चांगले योगदान दिले आहे. मुंबईत लाखो हिंदी भाषिक रोजीरोटीसाठी येऊन चांगल्यापैकी स्थिरावले व त्यांच्याच अर्थकारणावर उत्तर प्रदेशात लाखो चुली पेटत आहेत, याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. योगींसारख्या संतपुरुषाची पावले मुंबईस लागणे मंगलमय आहे. पण त्या पावलांनी त्यांच्या राज्याच्या विकासासाठी गुजरात भूमीकडेही वळावे. महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प आणि गुंतवणूक अगोदरच दुसऱ्या राज्यात वळाली आहे. मुंबईच्या बाबतीत अशी लांडगेतोड सुरु आहे. तरीही अतिथी देवो भव या नात्याने योगींचे स्वागत आहे. पण मुंबईच्या इंधनावर तुमच्या विकासाची गती वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्राशी इमान राखा. योगीजी हे भगव्या वस्त्रातील सत्पुरुष आहेत, पण त्यांच्यात एक राजकारणीही दडला आहे. योगी आदित्यनाथ यांना उद्या दिल्लीत झेप घ्यायची आहे. तेव्हाही हे इंधन लागेलच, असे ‘सामना’तून सांगण्यात आले आहे.
मुंबईत योगींचा रोड शो कशाला? मग शिंदे-फडणवीसही दाव्होसला रोड शो करणार का?- राऊत

मुंबईतील रोड शो राजकीय खेळी: सामना

आपल्या राज्याच्या उद्योगविषयक धोरणाबाबत प्रेझेंटेशन देणे वेगळे व त्या उद्योगपतीना आकर्षित करण्याच्या नावाखाली मुंबईत रोड शोचे आयोजन करणे वेगळे, योगींचा मुंबईतील रोड शो हा भाजप पुरस्कृत राजकीय खेळ आहे. योगी महाराजांवर त्या रोड शोमध्ये किती दौलतजादा, म्हणजे गुंतवणूक केली यावर सुद्धा प्रसिद्धी होऊ या. उद्योगपतीच्या नावाखाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे, असे ‘सामना’त म्हटले आहे.

तसेच योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत रोड शो करण्याचा सल्ला देणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे ऐकू नये, असेही सामनात म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री व इतर पन्नासेक लोकांची वरात दाव्होस येथे जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेस निघाली आहे. परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी हे बिऱ्हाड त्यांची वरात घेऊन निघाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांचे बिऱ्हाड दाव्होसला जाऊन गुंतवणूकदारांच्या गाठीभेटी घेईल, गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी दाव्होसच्या रस्त्यावर रोड शो नक्कीच करणार नाहीत, हे मुंबईत रोड शो करणाऱ्या योगी महाराजांनी समजून घेतले पाहिजे. योगी महाराज हे एक शहाणे व सरळमार्गी नेते आहेत, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

1 COMMENT

  1. Your article has answered the question I was wondering about! I would like to write a thesis on this subject, but I would like you to give your opinion once 😀 totosite

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here