Maharashtra Politics | गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते सातत्याने संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा करत आहेत. यामध्ये आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा केली आहे. संजय राऊत १०० दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिले , ते त्यांना कमी वाटत असावेत.

हायलाइट्स:
- मी २६ डिसेंबरच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलंय
- ते कात्रण मी माझ्या वकिलांकडे पाठवले आहे
मी २६ डिसेंबरच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवले आहे. ते कात्रण मी माझ्या वकिलांकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणार नाही, दखल घेणार आहे. प्रत्येक गोष्ट आणि वाक्य माझ्या लक्षात राहते, हा माझा वाईट स्वभाव आहे. त्यामुळे संजय राऊतांनी लिहलेला २६ डिसेंबरचा अग्रलेखही माझ्या लक्षात आहे. मी संजय राऊत यांना सोडणार नाही. मी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करेन. संजय राऊत १०० दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिले , ते त्यांना कमी वाटत असावेत. त्यामुळे राऊतांना पुन्हा तुरुंगात जावेसे वाटत असेल. मी त्यांच्या तुरुंगात परत जाण्याचा रस्ता मोकळा करतोय, असे नारायण राणे यांनी म्हटले. यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.
गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांनीही संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला होता. यावरुन संजय राऊत यांनी ‘मटा ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीत दीपक केसरकर यांना प्रत्युत्तर दिले होते. मी महाराष्ट्र आणि माझ्या पक्षासाठी पुन्हा तुरुंगात जायलाही तयार आहे. मी दीपक केसरकर यांच्यासारखा पळपुटा नाही. असं असेल तर दीपक केसरकर यांनीही २०२४ साली तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला होता.
विनायक राऊतांची राणेंवर बोचरी टीका
काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका आणि गंभीर आरोप केले होते. नारायण राणे यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाचे घरासमोर डोके फोडून त्याचा खून केला. त्यानंतर नांदगाव येथे नेऊन त्याला जाळून टाकले,असे वक्तव्य विनायक राऊत यांनी केले होते. तसेच राणेंना पंतप्रधान मोदी यांनी झापल्याचा दावाही विनायक राऊत यांनी केला होता. नारायण राणे यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे यांना दम भरला. आधी या सचिवाला काढून टाका अन्यथा तुमचे खाते काढून घेतले जाईल, असा थेट दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना दिल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.