येत्या २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळं आपल्या नेत्याचा हा वाढदिवस शिवसैनिकांसाठी निश्चितच मोठा आहे. दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक व हितचिंतकांची ‘मातोश्री’ निवासस्थानी रीघ लागते. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी वेळीच या संदर्भात आवाहन केलं आहे.
वाचा:
‘मी वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळं कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसंच, हारतुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हस्ते देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. कुठेही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लावू नयेत किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहनही त्यांनी शिवसैनिक व हितचिंतकांना केलं आहे.
गेल्या ४ महिन्यांभपासून राज्य सरकार हे नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने करोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. करोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे,असं सांगतानाच, ‘वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान,प्लाझ्मा दान करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
वाचा:
अजित पवार, फडणवीसांचाही वाढदिवसही साधेपणाने
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही २२ जुलै रोजी वाढदिवस झाला. करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी कोणत्याही सोहळ्याशिवाय हा वाढदिवस साजरा केला. तसं आवाहन त्यांनी आधीच केलं होतं. हितचिंतक व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times