नाशिक : इंदिरानगर परिसरात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमागे पैशांचा वाद असल्याचे कारण समोर येत आहे. पैशाच्या झालेल्या वादातून नाशिकच्या इंदिरानगर बोगदा परिसरात गोळीबार झाला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तीन संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तक्रारदार आणि गुन्हा दाखल केलेला संशयित मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार त्याने त्याच्या मित्राला काही दिवसांपूर्वी दोन लाख रुपये उसने दिले होते. त्यांनतर ३१ डिसेंबरला तक्रारदाराने संशयिताकडून तीन दिवसांसाठी त्याच्याकडील चार चाकी वापरण्यासाठी घेतली होती.

कार ३ दिवसांसाठी घेतली मात्र काही कारणामुळे ती कार वेळेवर देणे तक्रारदाराला शक्य झाले नाही. त्यामुळे तो गुरुवारी रात्री पावणे बाराला त्याच्या चौघा मित्रांसोबत संशयिताला कार देण्यासाठी इंदिरानगर बोगदा परिसरात आला. त्यावेळी संशयित आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले. संशयिताने त्याच्या खिशातून देशी बनावटीची पिस्तुल काढत हवेत गोळीबार केला आणि जीवे ठार मारण्याची धमकी देत तक्रारदाराच्या दिशेने पुन्हा गोळीबार करण्यासाठी बंदूक ताणली मात्र बंदुकीतून गोळी फायर झाली नाही. यावेळी घाबरलेल्या तक्रारदाराने आणि त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

भाजपच्या सभेत स्टेजवर अश्लील नृत्य, चित्रा वाघ यावर का बोलत नाहीत?; दमानियांचा सवाल

तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संशयिताविरोधात मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर तिन्ही संशयितांचा मुंबई नाका पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक शहरात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

या आधी देखील नाशिकमध्ये अशा प्रकारे गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील इगतपुरी शहरात गॅंगवॉरचा भडका उडाला होता. त्यावेळी दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात एका जणाचा मृत्यू झाला होता. तर एक जखमी झाला होता. त्यानंतर अंबड परिसरात भंगार व्यावसायाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली. आता पुन्हा इंदिरानगर बोगदा परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, भविष्यात जीवितहानी होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शस्त्र-अस्रांचा अशा प्रकारे वाढत असलेला वापर चिंतेचा विषय आहे. अशा घटनांमुळे पोलिसांपुढील आव्हान देखील वाढत आहे.

जिममध्ये व्यायाम करताना हॉटेल चालकाला हार्ट अटॅक, ट्रेनरसमोरच कोसळले, पाहा VIDEO…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here