पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून महापुरुषांबाबत होणाऱ्या वक्तव्यांवरून वाद सुरू आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेलं वक्तव्यही वादात सापडलं. यानिमित्ताने महाविकास आघाडीला घेरण्याची संधी साधत भाजपनेही राज्यव्यापी आंदोलन केलं. अशातच आता पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव घेताना चूक झाली. मात्र अजित पवार यांनी आपली चूक सुधारत ताबडतोब दिलगिरीही व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना सुरू असतानाच अजित पवारांकडून झालेल्या या उल्लेखाबाबत भाजपकडून निशाणा साधला जाण्याची शक्यता आहे.