नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात सुरू असलेलं शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक टोकदार होत चाललं आहे. राणे यांनी आज मुंबईत बोलताना संजय राऊत यांच्याविषयी खळबळजनक गौप्यस्फोट केल्यानंतर राऊत यांनीही पलटवार केला आहे. मी पक्ष सोडणाऱ्या गद्दारांचं तोंडही बघत नाही, असं ते म्हणाले. तसंच यापुढे आमच्या नादाला लागला तर आम्ही काय आहोत, हे तुम्हाला कळेल, असा आक्रमक इशाराही राऊत यांनी दिला आहे.

मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत हे मला भेटले आणि उद्धव व रश्मी ठाकरेंबद्दल काय-काय बोलले हे मी उद्धव यांची भेट घेऊनच सांगणार आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर ते चांगलं लक्षण आहे. मात्र नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मी त्यांना कधीही भेटलेलो नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. राणे यांना उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मी निमित्त ठरत असेल, तर चांगली गोष्ट आहे. माझं आताच या विषयावर उद्धवसाहेबांशी फोनवर बोलणं झालं. यावर बोलताना तेही हसले आणि मीही हसलो,’ अशा शब्दांत राऊत यांनी राणेंच्या दाव्याची खिल्ली उडवली.

मिसेस मुख्यमंत्र्यांच्या मैत्रिणीची मुलगी म्हणून एक कोटींचं बक्षीस? भाजप खासदाराचा सवाल

नारायण राणे यांच्यासोबत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबद्दलही संजय राऊत यांनी भाष्य केलं. ‘या सगळ्याला सुरुवात कोणी केली? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये चिखलफेक करण्यास सुरुवात याच माणसाने केली. आम्ही अशी भाषा वापरली नाही, आमच्यावर तसे संस्कारही नाहीत. कधीकाळी हेच राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही याच भाषेत बोलत होते. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्याबाबतही हा माणूस असंच बोलला आहे. कोण आहात तुम्ही? असा आता माझा यांना प्रश्न आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हे सरकार फेब्रुवारी महिनाही बघणार नाही, सुप्रीम कोर्टात १६ आमदार अपात्र ठरणार आहेत, असा दावाही यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here